मुंबई : आमदारांवरील नजरकैद, मतगणितांच्या बेरजा-वजाबाक्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर आज, शुक्रवारी राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थात गणिती आकड्यांचे राजकीय अन्वयार्थ हे नेहमीच अपेक्षापेक्षा वेगळे असल्यामुळे संध्याकाळी हाती येणाऱ्या निकालांबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे.
माजी मंत्री अनिल देशमुख आणि अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांना मतदान करू देण्यास न्यायालयाने मनाई केल्याने महाविकास आघाडीची दोन मते कमी झाली आहेत. मात्र, उमेदवार निवडून येण्याचा कोटाही त्यामुळे किंचित कमी झाला आहे. निवडणुकीमध्ये आणखी दोन आमदार अनुपस्थित राहिले, तर ४२ मतांचा कोटा हा ४१वर येण्याची दाट शक्यता आहे. या शक्यतेचा सर्वाधिक फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो, असे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे कमी झालेली मते ही आघाडीचीच असल्याने आमच्यासाठी हे अधिक फायद्याचे असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
भाजपकडे स्वतःची १०६ मते आहेत. त्यांना राजू पाटील (मनसे), रत्नाकर गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष), विनय कोरे (जनसुराज्य), रवी राणा, प्रकाश आवाडे, महेश बालदी, राजेंद्र राऊत (चौघे अपक्ष) या सात आमदारांचा पाठिंबा आहे. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांची पार्श्वभूमी संघाची असल्याने त्यांचा पाठिंबाही भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अग्रवाल यांनी संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर सही दिल्याने त्यांचे मत नक्की कुणाला जाणार, याबाबत साशंकता आहे. शिवसेना आमदारांची संख्या ५६ असून, अंधेरीचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ती ५५ झाली आहे. शिवसेनेला नऊ आमदारांचा पाठिंबा आहे. यात मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील, राजकुमार पटेल, बच्चू कडू, आशिष जैस्वाल, शंकरराव गडाख, राजेंद्र पाटील यड्रावकर, नरेंद्र भोंडेकर आणि गीता जैन या आमदारांचा समावेश आहे.
काँग्रेसचे ४४ आमदार असून त्यांना बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील (बोईसर), क्षितीज पाटील (नालासोपारा), हितेंद्र ठाकूर (वसई) या तीन आमदारांचा पाठिंबा असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. मात्र या तिन्ही आमदारांवर देवेंद्र फडणवीस यांचाच प्रभाव असेल, असे बोलले जाते. त्यामुळे या तिघांची मते महाविकास आघाडीचे नेते गृहित धरत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार असून, त्यातील अनिल देशमुख व नवाब मलिक हे ‘ईडी’च्या आरोपांमुळे तुरुंगात आहेत. तसेच त्यांना मतदान करू देण्यास न्यायालयाने मनाई केल्याने त्यांची मते सोडून राष्ट्रवादीची संख्या ५१ होते. त्यांना सहा आमदारांचा पाठिंबा असून त्यात देवेंद्र भुयार (स्वाभिमानी पक्ष), संजय शिंदे, केशव जोरगेवार (दोघे अपक्ष), शामसुंदर शिंदे (शेकाप), रईस शेख, अबू आझमी (दोघे समाजवादी पक्ष) यांचा समावेश आहे. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपला पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला असल्यामुळे महाविकास आघाडीकडे विनोद भिवा निकोले यांचेही मत आहे. महाविकास आघाडीचे एकूण आमदार व सरकारला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या १७१ होते. मात्र यातील नवाब मलिक, अनिल देशमुख यांना आता मतदानाला येणे शक्य नसल्यामुळे ते दोन व हितेंद्र ठाकूर यांची तीन मते वजा केल्यास हा आकडा १६६ होतो. तर विनोद अग्रवाल यांच्यासह भाजप व त्यांच्या समर्थकांची संख्या ११४ होते. यात बहुजन विकास आघाडीची मते मिळवली तर ही संख्या ११७ वर जाते.
दोन्ही बाजूकडून रस्सीखेच
भाजपने पहिल्या दोन उमेदवारांना ४२चा कोटा दिल्यास त्यांच्याकडे ३३ मते शिल्लक राहतात. तर, महाविकास आघाडीने आपल्या तीन उमेदवारांना ४२चा कोटा दिल्यास त्यांची ४० मते शिल्लक राहतात. त्यामुळे सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार आकडेवारीत पुढे असल्याने त्याला दुसऱ्या पसंतीच्या कमी मतांची गरज राहील.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपापल्या उमेदवारांना ४२ मते देण्याऐवजी काही गडबड होऊ नये म्हणून दोन ते तीन मतांचा कोटा वाढवून देण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीचा ४४चा कोटा दिला जाईल.
आझमगढी हे थेट काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचेच उमेदवार असल्याने काँग्रेसकडील सर्व ४४चा कोटा त्यांना दिला जाईल, याचीच शक्यता अधिक आहे. असे झाल्यास आघाडीच्या म्हणजेच सेनेच्या दुसऱ्या उमेदवारांची पहिल्या पसंतीची मते ४० वरून ३६ वर येतील व चुरस अधिक वाढेल.
या सर्व गणितात एमआयएमची मते कुठेच धरलेली नाहीत. त्यांनी भाजपला मतदान केले तर त्यांचा उमेदवार थेट ३५वर जाईल व ही चुरस अधिक वाढेल. त्यानंतरही दुसऱ्या क्रमांकाची मते आघाडीच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता जास्त आहे. या परिस्थितीत एमआयएमचे आमदार मतदानाला न येण्याच्या शक्यतेकडे लक्ष वेधण्यात येत आहे.
देशभरातही चुरस
धोरणांच्या अंमलबजावणीत कळीच्या ठरणाऱ्या राज्यसभेतील रिक्त जागांबाबत आज निर्णय होणार आहे. उत्तर प्रदेश ११, महाराष्ट्र ६, तमिळनाडू ६, बिहार ५, आंध्र प्रदेश ४, राजस्थान ४, कर्नाटक ४, ओडिशा ३, मध्य प्रदेश ३, तेलंगणा २, छत्तीसगड २, झारखंड २, पंजाब २, हरयाणा २, उत्तराखंडमध्ये एका जागेबाबत आज, शुक्रवारी चित्र स्पष्ट होईल.