नवी दिल्ली : अग्निवीर योजनेबाबत देशभरात सुरू असलेल्या गदारोळात सरकार विविध घोषणा करून हा संपूर्ण वाद संपवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून या योजनेबाबत अनेक घोषणा केल्या जात आहेत. गृह मंत्रालयाच्या अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये आरक्षण जाहीर केल्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही काही घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये अग्निवीरांना स्वस्त दरात कर्जाची सुविधाही दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
इतर कामांसाठी कर्ज मिळेल
संरक्षण मंत्री कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये असे सांगण्यात आले आहे की, चार वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर बाहेर पडणार्या तरुणांना आयुष्यभर अग्निवीर म्हणून ओळखले जाईल. मला आनंद आहे की, या अग्निवीर जवानांची लष्करी सेवा संपल्यानंतर त्यांना अनेक शासकीय विभागांमध्ये निवडीसाठी प्राधान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांना इतर कोणतेही काम करायचे असेल तर त्यांना स्वस्त दरात कर्जाची सुविधाही दिली जाईल.
संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, अग्निवीर हे केवळ देशाच्या सैन्यात नवीन भरती करण्याचे नाव नाही, तर त्यांना आज लष्करातील जवानांना जे दर्जेदार प्रशिक्षण मिळत आहे, त्याच दर्जाचे प्रशिक्षणही दिले जाईल. प्रशिक्षणाचा कालावधी कमी असेल पण गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या आठ वर्षांत प्रत्येक भारतीयाच्या लक्षात आले आहे की, सध्या भारतात असे सरकार आहे जे केवळ आपल्या सीमेतीलच नाही, तर जगाच्या कानाकोपर्यातील भारतीयांची चिंता करते.
