Monday , December 23 2024
Breaking News

राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी; 26 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

Spread the love

 

नवी दिल्ली : राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करून त्याचे संरक्षण करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर लवकर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर 26 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. भाजप नेते खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या कार्यकाळात सेतू समुद्रम प्रकल्प योजना सुरू करण्यात आली. मालवाहू जहाजांच्या वाहतुकीसाठी मार्ग तयार करण्यासाठी राम सेतू तोडण्यात येणार होते. मात्र, कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. तेव्हापासून राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे.
वर्ष 2014 मध्ये एनडीए आघाडीचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारने देशहितासाठी राम सेतूचे कोणतेही नुकसान होऊ देणार नसल्याचे सुप्रीम कोर्टात म्हटले. केंद्र सरकारकडून सेतू समुद्रम प्रकल्पासाठी पर्याय शोधत आहे. मात्र, केंद्र सरकारने राम सेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन त्याचे भविष्यात संरक्षण करण्याबाबत सरकारने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
वर्ष 2017 पासून सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आपल्या याचिकेवर सुनावणी करण्याबाबत कोर्टाला अनेकदा विनंती केली आहे. सुप्रीम कोर्टाने 13 नोव्हेंबर 2019 रोजी केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सहा आठवड्यांचा वेळ दिला होता. मागील वर्षी एप्रिल महिन्यात तत्कालीन सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हटले होते की, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे आगामी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या समोर ही याचिका योग्य निर्देशासाठी आणण्यात यावी.
खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज या प्रकरणी सरन्यायाधीश रमण्णा, न्या. कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर आपली बाजू मांडत याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याची विनंती केली. त्यानंतर खंडपीठाने स्वामी यांची याचिका आणि इतर मुद्यांशी निगडीत असलेल्या याचिकेवर 26 जुलै रोजी सुनावणी करणार असल्याचे सांगितले.
राम सेतू काय आहे?
तामिळनाडू येथील रामेश्वरम आणि श्रीलंकेतील मन्नार दरम्यान चुनखडकांपासून तयार झालेला एक सेतू आहे. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार हा सेतू याआधी समुद्रावर होता. सेतूवरून चालत श्रीलंकेत दाखल होता येत होते. याला अ‍ॅडम्स ब्रिज म्हणतात. तर, हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, हा सेतू प्रभू श्रीराम यांच्या वानर सेनेने तयार केला आहे. प्रभू श्रीराम यांनी रावणाचा पाडाव करण्यासाठी याच पुलाचा आधार घेत श्रीलंकेत प्रवेश केला होता.

About Belgaum Varta

Check Also

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड

Spread the love  नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *