नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस हाच सध्या तरी कोरोनाविरुद्धच्या लढाईतील महत्वाचे अस्त्र आहे. देशात आता कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांचा आकडा ५० कोटी पार झाला आहे. यासंदर्भात बोलताना आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, ५० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे ही अभिमानास्पद कामगिरी आहे. लसीकरण प्रक्रियेमधील सातत्य ठेवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यामुळे कोरोना महामारीपासून सर्वांना सुटका होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दररोज ४० लाख डोसचे उत्पादन
देशात लसीकरणास प्रारंभ झाला तेव्हा दररोज लसीचे अडीच लाख डोसची निर्मिती होत होती. सध्या दररोज ४० लाख डोसचे उत्पादन होत आहे. लस उपलब्ध होण्याबरोबर लसीकरण मोहिम अधिक सक्षमपणे राबवता येणार आहे. सरकार लस
उत्पादनचा वेग कायम ठेवणार आहे, असेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
मुलांना लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु
मुलांना लस उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. सर्व सुरक्षा नियमांचे पालन करुन याबाबत परीक्षणही सुरु आहे. लवकर मुलांसाठीही लस उपलब्ध होईल, असा विश्वासही डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केला.
केवळ २० दिवसांमध्ये १० कोटी नागरिकांना लस
देशभरात ५० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मागील २० दिवसांमध्ये तब्बल १० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
कोरोनाविरुद्धच्या लढाईला मिळाली प्रबळ प्रेरणा : पंतप्रधान
देशातील लसीकरण मोहिमेने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईला मिळाली प्रबळ प्रेरणा मिळाली आहे. मला आशा आहे की भविष्यातही यामध्ये भर पडत जाईल. सर्वांना मोफत लसीकरण मोहिमेमध्ये आपल्या नागरिकांना लस दिली जाईल, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.