नवी दिल्ली : गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी (दि.8) केली. या राज्यांतील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान मतदान होईल. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी आणि मणिपूरमध्ये 27 फेबुवारी आणि 3 मार्च रोजी मतदान होईल. पाच राज्यांतील मतमोजणी 10 मार्चला होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फ्रेबुवारीला होईल. उत्तर प्रदेशात दुसर्या टप्प्यातील मतदान 14 फेब्रुवारी रोजी, तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 3 मार्च आणि सातव्या टप्प्यातील मतदान 7 मार्च रोजी होईल.
गोवा, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यांत 14 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. गोव्यात 21 जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 28 जानेवारी पर्यंत असेल. गोव्यात अर्ज माघारीची तारीख 31 जानेवारी आहे. तर गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होईल.
रोड शो, पदयात्रा आणि जाहीर सभांना बंदी
कोरोनामुळे 15 जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा आणि जाहीर सभांना बंदी असेल. उमेदवारांनी सोशल मीडियावरुन जास्तीत जास्त प्रचार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. घरोघरी प्रचारासाठी केवळ पाचजणांना परवानगी असेल, असेही त्यांनी सांगितले.
पाच राज्यांतील एकूण 690 मतदारसंघात मतदान होणार आहे. गोव्यात 40 मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. एकूण 18.34 कोटी मतदार या निवडणूक प्रक्रियेत सहभागी घेतील. यात 8.55 कोटी महिलांचा समावेश आहे.
निवडणुकीत मतदारांचा सर्वांधिक मतदारांचा सहभाग होईल, हा उद्देश आहे. कोरोना काळात निवडणुका निवडणुका घेणं आव्हानात्मक आहे. पण सुरक्षेची काळजी घेऊन निवडणुका होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे मतदान केंद्रात वाढ करण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या धास्तीत कोविडची प्रकरणे वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर एउख ने केंद्रीय आरोग्य सचिव आणि गृह सचिव, तज्ज्ञ आणि राज्यांचे आरोग्य सचिव यांच्यासोबत बैठका घेतल्या. त्यांच्याशी सल्लामसलत करुन सध्यस्थिती लक्षात घेतल्यानंतर, एउख ने सुरक्षिततेच्या निकषांसह निवडणुका जाहीर करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी नमूद केले.
गोव्यात उमेदवारांना खर्चाची मर्यादा 25 लाख रुपये
गोवा आणि मणिपूरमधील उमेदवारांना खर्चाची मर्यादा 25 लाख रुपये असेल. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमधील उमेदवारांना खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये असेल, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायजरची सोय करण्यात येणार आहे. 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि कोविड रुग्ण पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकणार आहेत, असे ते म्हणाले.
मतदानाची वेळ एक तासाने वाढवली
कोरोनामुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता निवडणूक वेळापत्रकांच्या घोषणेपासून लगेच लागू होते. आचारसंहिता मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने विस्तृत व्यवस्था केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणीही उल्लंघन केल्यास कठोरपणे कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच संबंधित राज्यांतील कोविड तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेतला. सदर राज्यातील प्रशासनांनी लसीकरण मोहिमेला वेग द्यावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. गेल्या काही काळात कोरोनाचे संकट वाढल्याने निवडणुका लांबणीवर टाळण्याची मागणी करण्यात आली होती. पण आता निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
