पणजी : काँग्रसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी आज (सोमवारी) सकाळी भूमिका देवीचे दर्शन घेतले. पत्नी विजयादेवी यांच्यासोबत त्यांनी मंदिरात देवीला नारळ ठेवला. त्यांच्या या देवदर्शनानंतर सध्या राज्यात ते निवडणूक लढवणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. संध्याकाळी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पर्ये मतदारसंघातून प्रतापसिंह राणे ८ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. १९८० पासून ते १० वर्षे सलग राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ६ वेळा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त्यांचे पुत्र विश्वजित राणे भाजपच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री आहेत. विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या पत्नी डॉ. दिव्या राणे यांना भाजपकडून पर्ये मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाली आहे.
प्रतापसिंह राणे हे सून डॉ. दिव्या यांच्या विरोधात स्वतः निवडणूक लढवणार की पत्नी विजयादेवी यांना निवडणुकीस उभे करणार याबाबत चर्चाना उधाण आले आहे. संध्याकाळी होणाऱ्या बैठकीनंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेसने राणे यांना पूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे.
