Saturday , July 27 2024
Breaking News

‘भ्रष्टाचार संपवण्यासाठीच तृणमूल गोव्यात’

Spread the love

'भ्रष्टाचार संपवण्यासाठीच तृणमूल गोव्यात'

सांत आंद्रेचा रखडलेला विकास मार्गी लावणार, जगदीश भोबेंचा दावा

 

पणजी :गोव्यात माजलेला भ्रष्टाचार संपवून भ्रष्ट भाजप सरकारला घरी पाठवण्यासाठीच तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात आला आहे. काँग्रेसचे दहा आमदार खरेदी करण्याची कृती हाही एक मोठा भ्रष्टाचार आहे. भ्रष्ट सरकारला घरी पाठवण्याचा सांत आंद्रेतून आम्ही श्रीगणेशा केला आहे, असा दावा करून सांत आंद्रेचा रखडलेला विकास मार्गी लावणार, अशी ग्वाही तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जगदीश भोबे यांनी गोमन्तकशी बोलताना दिली.

प्रश्न : तुमच्या मतदारसंघात कोणते प्रश्‍आहेत, अन्‌ तुम्ही त्यापैकी कोणते सोडवले?

उत्तर : मतदारसंघातील प्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी विद्यमान आमदाराची आहे, जो गेल्या २० वर्षांपासून या पदावर आहे. त्याने हे प्रश्‍न सोडवले असते तर हा मुद्दा उपस्थितच झाला नसता. या आमदाराने पूल बांधला, पण अनेक वर्षे उलटली तरी त्याला जोडरस्ताच नाही. युवकांसाठी क्रीडा मैदानाचा प्रश्‍न आहे. आजोशी मैदानावर खाजन शेतीचे पाणी शिरते. समस्या तशाच असल्याने लोक आमच्यावर राग काढतात. ते निराश झाले आहेत. त्यांचा आमदारावरील विश्‍वास उडाला आहे. या आमदाराच्या खोटारडेपणामुळे लोक आम्हालाही तसेच समजतात. मात्र मी लोकांना सांगू इच्छितो की विश्‍वास ठेवा, मी तसा खोटारडेपणा करणार नाही.

प्रश्न : प्रचार कसा चाललाय?

उत्तर : माझा प्रचार जोरात सुरू असून तो अंतिम टप्प्यात आहे. आधी मी गोवा फॉरवर्ड पक्षात होतो. त्यामुळे दोन महिन्यांआधीपासूनच मी प्रचार सुरु केला होता. आतापर्यंत सहा पंचायतक्षेत्रांत प्रचार केला आहे. आता मी तृणमूलचा उमेदवार असलो तरी व्यक्ती म्हणून मी तोच आहे.

प्रश्न : कोणत्या कामाला प्राधान्य द्याल?

उत्तर : पाणी, वीज, बेकारी व अन्य अनेक प्रश्‍न आहेत. यात महत्त्वाचा युवकांना रोजगार देण्याचा प्रश्‍न आहे. व्यवसाय, व्यावसायिकांना सुरक्षा देण्याला मी प्राधान्य देईन. कारण येथील आमदार लोकांच्या व्यवसायावर पाय ठेवू लागला आहे. मतदारसंघात अनेक छोटेमोठे व्यवसाय करणारे लोक आहेत. त्यांना अशावेळी सुरक्षा देणे गरजेचे आहे.

प्रश्न : निवडून आल्यास तुम्ही दुसऱ्या पक्षात जाणार?

उत्तर : गोव्यात यावेळी तृणमूल काँग्रेसचे  सरकार सत्तेवर येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. पक्षाला बहुमत मिळाले नाही तर काय करायचे त्याचा निर्णय पक्ष घेईल.

प्रश्न : तृणमूल काँग्रेस पक्ष केवळ आश्वासनेच देतो,अशी टीका होतेय

उत्तर : सत्तेवर असलेल लोकच खोटी आश्‍वासने देतात. 50 हजार नोकऱ्या युवकांना देण्याचे आश्‍वासन भाजप सरकारनेच दिले आहे. कोठे गेल्या त्या नोकऱ्या ते त्यांनी सांगावे. खाण व्यवसायात 35 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे भाजप नेत्यांनीच सांगितले होते. ते हजारो कोटी रुपये त्यांनी अजून का वसूल केले नाहीत? युवकांना 50 हजार नोकऱ्या द्यायच्या होत्या, तर ते काम बऱ्याच काळापूर्वी करायला हवे होते. निवडणुकीला तीन महिने असताना नव्हे. हा खोटारडेपणा आहे. खाण घोटाळ्यातील 35 हजार कोटी रूपये वसूल केले असते तर लोकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख टाकता आले असते. ते पैसे वसूल करावेत.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

Spread the love  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *