Saturday , July 27 2024
Breaking News

राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये ‘अग्नितांडव’; 30 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 12 लहान मुले

Spread the love

 

राजकोट : शनिवारी (25 मे 2024) टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागली. या आगीत 30 लोकांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. राजकोटमधील गेम झोन हे गर्दीचं ठिकाण असल्यानं आग लागली त्यावेळी गर्दी होती. त्यामुळे अनेकजण होरपळल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या दुर्घटना प्रकरणी एसआयटी नेमली जाणार असून चौकशी केली जाणार आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून यासंदर्भात माहिती दिली. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

राजकोटचे जिल्हाधिकारी प्रभाव जोशी यांनी या दुर्घटनेविषयी माहिती देताना सांगितलं की, “आम्हाला साडेचार वाजता आग लागल्याची माहिती मिळाली, तात्काळ रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे. येथील टीआरपी गेमिंग झोन पूर्णपणे जळून खाक झालं आहे. आगीत 30 जणांचा होरपळून मृत्यू झाला. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.”

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

प्रभावित टीआरपी गेम झोन आणि अधिकाऱ्यांना भीती आहे की, मृतांची संख्या वाढू शकते. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि शनिवार, रविवार यामुळे घटनास्थळी बरीच मुलं उपस्थित होती. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करून शहर प्रशासनाला आग लागल्यास तातडीनं बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आग लागल्यास तातडीनं बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना महापालिका आणि प्रशासनाला दिल्या आहेत. जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री पटेल यांनी दिले आहेत.

भीषण आगीमुळे इमारत कोसळली अन् होत्याचं नव्हतं झालं

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भीषण आगीमुळे इमारत कोसळली आणि त्याखाली लोक गाडले गेले. त्यामुळे आगीनं आणखी रौद्ररूप धारण केलं. आग लागली त्यावेळी अनेकजण गेम झोनमध्ये उपस्थित होते. कोणालाही काही कळण्यापूर्वीच होत्याचं नव्हतं झालं आणि अनेकांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये 9 लहान मुलांचाही समावेश आहे. आग लागली तेव्हा लहान मुलांसह अनेक लोक खेळ खेळत होते.

गेमिंग झोनला मिळाली नव्हती एनओसी

राजकोट गेम झोन दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, वीजेतील तांत्रिक बिघाडांमुळे आग लागली. मात्र, आगीचं मुख्य कारण अद्याप समोर आलेलं नाही. या गेमिंग झोनला अग्निशमन विभागाकडून एनओसी मिळालेली नाही. याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

Spread the love  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *