पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांची भावना
मुंबई : सलग 15 वर्ष सत्तेत होतो मग त्यानंतर सत्ता गेली. त्या काळात काही नेत्यांनी पक्ष सोडला पण त्यामुळे अनेक नवीन नेतृत्व तयार झालं. त्या आधी त्यांचं कर्तृत्व कधी दिसलं नाही पण या आता ते जबाबदारीने आपलं काम करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
राष्ट्रवादीने महाराष्ट्रात नेतृत्वाची फळी उभी केली
आजच्या दिवशी 22 वर्षांपूर्वी संघटना उभी करण्याची भूमिका स्वीकारली, ती कितपत योग्य होती याचा आढावा घ्यायचा आजचा दिवस आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, सत्ता ही केंद्रीत व्हायला नको. तसं झालं तर ती भ्रष्ट होते. सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला आपण या सत्तेचा भाग असल्याची जाणीव झाली पाहिजे. आज राष्ट्रवादीचा प्रवास बघता, पक्षाने महाराष्ट्रात नेतृत्वाची फळी निर्माण केली आहे.
सत्ता गेल्यानंतर काही लोक गेले पण नवीन नेतृत्व तयार झाल्याचं सांगत शरद पवार म्हणाले की, आजचं मंत्रिमंडळ बघितलं तर अनेक सहकारी जबाबदारी पेलत आहे. त्यांचे कर्तृत्व या आधी दिसलं नव्हतं. कोरोना काळात राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी केलेल्या कामाची स्तुती शरद पवार यांनी केली.
राज्यातील प्रत्येक घटकाला महाविकास आघाडीचे सरकार न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत शरद पवारांनी मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण हे प्रश्न आपल्याला सोडवले पाहिजे असंही सांगितलं.
हे सरकार पाच वर्षे टिकेल
इंदिरा गांधी यांना दिलेला शब्द बाळासाहेब यांनी पाळला होता असं सांगत शरद पवार म्हणाले की, इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी सेनेने एक उमेदवार दिला नाही, बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता तो पाळला हा इतिहास आहे. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल.
आपण महाविकास आघाडीचा पर्याय दिला, लोकांनी तो पर्याय स्वीकारला. आजच्या घडीला महाविकास आघाडी सरकार उत्तमरित्या काम करत असल्याचंही शरद पवार म्हणाले. येणारी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.