तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नेसरीसारख्या ग्रामीण भागातील कोलेकर महाविद्यालयाने हिंदी भाषेत आंतरराष्ट्रीय ई- चर्चासत्राचे आयोजन करणे गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांनी केले. येथील शिक्षण समिती कसबा नेसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय व सृजन ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय ई- पत्रिका, ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त विद्यमाने वर्तमान परिप्रेक्ष्य में मीडीया, साहित्य, समाज और संस्कृति या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय वेबीनार उदघाटन प्रसंगी बोलत होते. संस्था अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य ऍड. हेमंत कोलेकर अध्यक्षस्थानी होते.
कुलगुरू डाॅ. शिर्के म्हणाले, महाविद्यालयाने वेबीनार आयोजित करून मीडीया, साहित्य, समाज व संस्कृती चार विषयांच्या योगदानवर प्रकाश टाकला आहे. वेबीनार समाज घटकावर आधारित आसल्यांने याचे महत्व अधोरेखित झाले आहे. मीडीयाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातील चांगल्या, वाईट घटना तात्काळ प्रसारित होतात. सध्याच्या वैश्विक महामारीची समस्या मोठी आहे. सकारात्मक विचारांची आवश्यकता असून ई-चर्चासत्रातून पोषक वातावरण निर्मिती होते आहे. ऍड. कोलेकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय ई- चर्चासत्राच्या आयोजनातून विश्वच माझे घर संकल्पनेला पुष्टी मिळते आहे. प्र. प्राचार्य डाॅ. एस. बी. भांबर यांनी स्वागत व प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय ई- चर्चासत्र आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डाॅ. अर्जुन चव्हाण, सुप्रसिद्ध लेखिका डाॅ. पुष्पिता अवस्थी (नेदरलॅंड ), उच्च शिक्षा व शोध संस्थान हैद्राबादचे हिंदी विभाग प्रमुख डाॅ. संजय मादार, विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरचे डाॅ. दिपक तुपे, सृजन ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय ई- पत्रिका ऑस्ट्रेलियाचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती पूनम चतुर्वेदी यांचे मार्गदर्शन झाले. या सत्रांचे अध्यक्षस्थान अनुक्रमे सृजन ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय ई- पत्रिका ऑस्ट्रेलियाचे मुख्य संपादक डाॅ. शैलेश शुक्ला, सात्रळ महाविद्यालय अहमदनगरचे हिंदी विभाग प्रमुख डाॅ. भाऊसाहेब नवले, शिक्षण समिती कसबा नेसरीच्या संचालिका डाॅ. अर्चना कोलेकर यांनी भूषविले. देश-विदेशातून ६९० जणांनी ई-चर्चासत्रात सहभाग घेतला होता.
प्रा. एन. बी. ऐकिले यांनी सूत्रसंचालन केले. हिंदी विभाग प्रमुख डाॅ. संजय कांबळे यांनी आभार मानले.