कागवाड : कागवाड तालुक्यातील उगार शुगर वर्क्स हा कारखाना कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे बंद ठेवण्यात आला आहे. या कारखान्यातील कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय यादव, अनिल नावलीगेर, कल्लाप्पा करगार, गुंडू कदम, खालील खुदावंत यांच्या नेतृत्वाखालील शेकडो कार्यकर्त्यांनी अनियमित काळासाठी संप पुकारला आहे. या संपाला उगार बुद्रुक गावचे शेतकरी नेते आणि पीएलडी बँकेचे अध्यक्ष शीतलगौडा पाटील, वीरभद्र कटगेरी, अण्णासाब चौगुले यासह अनेक शेतकर्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन नैतिक पाठिंबा दर्शविला आहे.
शेतकरी नेते शीतलगौडा पाटील यावेळी बोलताना म्हणाले, कामगारांनी अनेक वर्षांपासून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु आजपर्यंत मागण्या पूर्ण करण्यात आली नसून कारखान्याच्या व्यवस्थापकांना मंगळवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. बेळगावमध्ये कामगार आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीला जबाबदार अधिकारी अनुपस्थित राहिले. यानंतर आंदोलनाला सुरूवात झाली. त्यांच्या मागण्या योग्य आणि न्यायसंमत आहेत. त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुकारलेल्या संपला आपला नैतिक पाठिंबा असल्याचे शीतलगौडा पाटील यांनी सांगितले. आंदोलनासंदर्भात कारखान्याच्या व्यवस्थापकांशी अनेकवेळा चर्चा करण्यात आली असून मागण्यांसाठी निवेदन देखील देण्यात आले आहे. यासंदर्भात चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले परंतु आजपर्यंत मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. एकूण 12 मागण्या कर्मचार्यांनी केल्या आहेत. कारखान्यात 1200 कामगारांची आवश्यकता आहे. मात्र सध्या केवळ 5 हजार कामगार या कारखान्यात काम करत आहेत. दररोज 20 हजार टन उत्पादन करण्यात येते. कंत्राटी तत्त्वावरील कामगारांना या कामासाठी वापरण्यात येत असून 10 ते 15 वर्षे काम करत असलेल्या कामगारांना अद्याप कायम तत्वावर घेण्यात आले नाही. मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्याची सूचना करण्यात आल्यास उद्धटपणे उत्तरे देण्यात येत आहेत. कितीही दबाव आणला तरी आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.सकाळी 6 पासून कारखान्याचे कामकाज बंद ठेवण्यात आला असून केवळ बॉयलर सुरु ठेवण्यात आला होता. मात्र सर्व कामगारांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडल्यामुळे दुपारपर्यंत बॉयलरदेखील बंद करण्यात येणार असल्याची माहिती यादव यांनी दिली. दररोज 20 हजार टन ऊस गाळप करण्याची क्षमता असलेल्या या कारखान्यात आज कामकाज बंद ठेवण्यात आले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत संप असाच सुरु राहील, असा निर्धार कामगारांनी केला आहे.
