निपाणी (वार्ता) : मुळगाव अक्कोळ (सध्या रा.निपाणी) येथील साहित्यिक आणि पत्रकार मनोहर हालाप्पा बन्ने (वय ७२) यांचे गुरुवारी (ता.३) निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ५)
निपाणी विभागातील मराठी वृत्तपत्रातील माजी मुख्य प्रतिनिधी म्हणून सुपरिचित असणारे मनोहर बन्ने हे प्रथितयश लेखक, कवी आणि चांगले समीक्षकही होते. अस्सल ग्रामीण बाज असणाऱ्या आपल्या ‘उरुस’ या कथा संग्रहातून ग्रामीण भागातील उपेक्षित व्यक्तिमत्त्वांचे आणि घटना-घडामोडींचे जिवंत चित्रण त्यांनी प्रभावीरीत्या सादर केले आहे.
मनोहर बन्ने यांनी लिहिलेल्या ‘अश्राप’ व ‘प्रतिद्वंद्व’या दोन कादंबऱ्या, ‘फक्त एक शून्य’हे नाटक, १९८१ च्या तंबाखू आंदोलनाचे ज्वलंत चित्रण असणारे ‘आंदोलन” हे प्रकट वास्तव यांसारखे साहित्य, त्या त्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार प्रसिद्ध होऊ शकलेले नाही. १७० ते १९८० च्या दशकात त्यांनी असंख्य दर्जेदार कविता लिहिल्या व त्या विविध मान्यवर नियतकालिकांतून प्रसिद्धही झाल्या. या आवडलेल्या उत्कृष्ट कवितांचे तीन-चार कविता संग्रह प्रकाशित करण्याच्या दृष्टीने कै. प्रा. रमेश शिप्पूरकर, उल्हास जोशी, प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे, वसंत भोसले, धनाजी गुरव आदींनी निश्चिती करून कवितांची निवडही केली होती. मात्र प्रा. रमेश शिप्पूरकर यांच्या अकाली निधनाने हा प्रयत्नही अर्ध्यावरच राहिला.
साहित्याचे अंग असल्यास पत्रकारिता हे निश्चितच एक प्रबळ व्यासपीठ ठरू शकते. साहित्याची चांगली जाण असणारा पत्रकार एखादी घटना अत्यंत प्रभावीरीत्या बातमीपत्राच्या माध्यमांतून मांडू शकतो, हे अनेक दिग्गज साहित्यिक पत्रकारांनी कृतीतून सिद्ध केले आहे. मनाहेर बन्ने यांनी एक लेखक, कवी, समीक्षक या नात्याने मराठी सारस्वतात चांगला संचार केला. तर पत्रकार या नात्याने पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी स्वत:चा असा एक वेगळा ठसा उमटविला आहे. या परिसरात साहित्यिकापेक्षा एक ज्येष्ठ आणि जाणकार निर्भीड पत्रकार म्हणूनच ते अधिक परिचित होते.
गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना १९८१ व १९८७ सालचे शिवाजी विद्यापीठाचे कै. ना. भि. परुळेकर पुरस्कार (न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते), १९८८ सालचा ग. गो. राजाध्यक्ष पत्रकारितेचा प्रथम पुरस्कार (खा. गोपाळराव मयेकर यांच्या हस्ते), १९८८ चा महालक्ष्मी बँक व तात्यासाहेब तेंडुलकर पुरस्कार, १९८९ चा महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकारिता प्रथम पुरस्कार (मा. शरद पवार यांच्या हस्ते), २००० सालचा कै. प्रा. डॉ. रमेश शिप्पूरकर पुरस्कार (आम. ए. बी. पाटील यांच्या हस्ते), २००० सालचा कर्नाटक राज्य श्रमिक पुरस्कार (एस. पी. अमरकुमार पांडे यांच्या हस्ते) यासारखे अनेकविध सन्मानजन्य व प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांनी प्राप्त केले होते.अतिशय निर्भीडपणे पत्रकार म्हणून, साहित्यिक म्हणून लेखन करणारे मनोहर बन्ने यांचे लेखन, विचार व पत्रकारिता निपाणी परिसरातील लोकांच्या नेहमी आठवणीत राहतील. अक्कोळ या त्यांच्या मुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, भाऊ भावजय, पुतणे असा परिवार आहे.