Friday , November 22 2024
Breaking News

इचलकरंजी पाणी प्रकल्पामुळे कर्नाटक सीमाभागाला फटका

Spread the love

 

नागरिकांचा विरोध कायम ; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील कर्नाटक सीमाभागात असलेल्या सुळकुड गावाजवळील दूधगंगा नदीच्या बंधाऱ्यातून थेट इचलकरंजी शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला त्याची अंमलबजावणी झाल्यास कर्नाटक सीमाभागातील पिण्याच्या पाण्यासह शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनून या भागाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध होत असून कृती समिती व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र सरकारने इचलकरंजी शहराला थेट पाईपलाईन द्वारे सुळकुड येथील दूधगंगा बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे उन्हाळ्यात कर्नाटक सीमा भागाला पाणी मिळणे कठीण होणार आहे. परिणामी सीमाभागातून गेल्या दोन महिन्यापासून सीमावर्ती भागातील तील १२ गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ पूर्ण विरोध करत आहेत.
इचलकरंजी पाणी प्रकल्पामुळे कोगनोळी, कुन्नूर, मांगूर, बारवाड, कारदगा, बेडकिहाळ, शमनेवाडी, चांद शिरदवाड, बोरगाव, जनवाड, सदलगा, मलिकवाड या भागातील शेतकरी व ग्रामस्थांना पाण्याची समस्या भेडसावणार आहे.
इचलकरंजी येथे पंचगंगा असली तरी ही नदी दरवर्षी जलपर्णी व इतर कारणामुळे पूर्णपणे प्रदूषित होते. या प्रदूषित पाण्यामुळे तेथील प्रशासकीय यंत्रणा आणि शहरवासीय ते पाणी वापरत नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची जानेवारीपासूनच शहर व परिसराला टंचाई जाणवते. ती दूर करण्यासाठी सुळकुड येथील दूधगंगा नदीच्या बंधाऱ्यातून पाणीपुरवठा प्रकल्प सुरू सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कर्नाटक सीमा भागातील नदीकाठची गावे व शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय सीमा भागातील नागरिकांच्या भवितव्यावर उठला आहे. परिणामी सीमावर्ती या भागातील नागरिक आणि शेतकरी प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे.
काळम्मावाडी धरण बांधल्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार दरम्यान दूधगंगा नदीचे पाणी वाटपासाठी करार करण्यात आला आहे. त्यानुसार कर्नाटकला दरवर्षी ४ टीएमसी पाणी देण्यात येत आहे. त्यासाठी मासिक योजनाही दोन्ही राजाच्या पाटबंधारे खात्याने तयार केली आहे. त्यामुळे सीमा भागातील शेतकरी ऊस, तंबाखू, भाजीपाला आणि इतर बागायती पिके घेत आहेत. तसेच उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवल्यास कर्नाटक शासनाच्या मागणीनुसार सीमा भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध केले जात आहे.
—————————————————————
जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन
महाराष्ट्राने सुळकुड बंधारा ते इचलकरंजीपर्यंत सिंचन प्रकल्प मंजूर केला आहे. त्यामुळे विविध गावांना पाण्याची उणीव भासणार आहे. या संदर्भात बेडकिहाळसह इतर गावातील शेतकरी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. एकंदरीत या प्रकल्पाला जोरदार विरोध होत असून पुढे काय होणार? याची चिंता नागरिक आम्ही शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
——————————————————————
‘सुळकुड बंधाऱ्यातून इचलकरंजी पर्यंत थेट पाणी योजना राबविण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे. त्याचा सीमा भागातील नागरिक आणि शेतकऱ्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे ही योजना त्वरित मागे घेणे आवश्यक आहे.’
-सुरेश देसाई, शेतकरी, कृषी पंडित, बेडकिहाळ
——————————————————————
‘इचलकरंजी पाणी प्रकल्प राबविल्यास सीमा भागातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजनावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे. शिवाय उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणेही कठीण आहे. त्यासाठी सीमा भागातील शेतकरी आणि नागरिकांनी या योजनेला विरोध करून वेळप्रसंगी आंदोलनाची तयारी ठेवावी.’
-राजगोंडा पाटील (टोपण), ग्रामपंचायत सदस्य, कोगनोळी

About Belgaum Varta

Check Also

तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी

Spread the love  बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *