
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात असलेल्या शाळांमध्ये अन्यायकारक शाळेचे शैक्षणिक शुल्क आकारले जाते आहे. शुल्क वसुली करताना जास्त रक्कम घेऊन कमी किमतीच्या पावत्या दिल्या जातात. याबाबत मानवाधिकार संघटनेने यापूर्वी राज्यातील शिक्षण खात्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी निपाणी येथील मानव अधिकार संघटना आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र लिहून शासनाच्या निर्धारित शैक्षणिक शुल्क व्यतिरिक्त जादा शुल्क घेऊ नये. तसेच शैक्षणिक शुल्काची माहिती फलकावर लावण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सर्वच शाळाकडून निर्धारित शुल्कापेक्षा जादाचे शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत.मानवाधिकार संघटनेने शिक्षणाधिकाऱ्याकडे याबाबतची समस्या मांडली होती. त्याची दखल घेऊन सर्वच शाळांमध्ये शैक्षणिक शुल्क माहिती फलकावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे फलक न लावणाऱ्या शिक्षण संस्थावर कारवाई करण्यात येणार आहे. मानव अधिकार संघटनेने दिलेल्या लढ्याला यश आले असून शासनाच्या निर्धारित शुल्कानुसारच पालकांनी शैक्षणिक शुल्क भरणे गरजेचे आहे.
आतापर्यंत विद्यार्थी चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्याच्या उद्देशाने पालक हजारो रुपये खर्च करून आपल्या मुलांना शाळेत घालत होते. पण निर्धारित शैक्षणिक शुल्का पेक्षा जास्त रक्कम घेऊन कमी रकमेची पावती शिक्षण संस्था कडून दिली जात होती. याबाबत मानवाधिकार संघटनेने तक्रार दाखल करून सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांना न्याय मिळवून दिल्याने पालकातून समाधान व्यक्त होत आहे.
————————————————————–
‘काही शिक्षण संस्थाकडून अन्यायकारक शैक्षणिक शुल्क आकारले जात होते. याबाबतच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्याची वरिष्ठांनी दखल घेऊन शैक्षणिक शुल्क आकारणीचे फलक लावण्याचा सूचना पत्राद्वारे दिली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.’
-महादेवी नाईक, गटशिक्षणाधिकारी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta