राजू पोवार; सुळगावमध्ये जनजागृती बैठक
निपाणी (वार्ता) : ऊस, सोयाबीन पिकाला हमीभाव मिळण्यासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. यंदाच्या उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर मिळावा,या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढून घेराव घातला जाणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. सुळगाव येथे आयोजित जनजागृती बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, सोयाबीन, ऊसाला योग्य दर मिळावा, यासाठी रयत संघटनेने आतापर्यंत मंत्री महोदयांसह जिल्हाधिकारी तलाठी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. पण याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे बेळगाव येथे सुरू झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंत्री महोदयांना घेराओ घालून खर्चाच्या तुलनेत योग्य दर देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
नितीन कानडे यांनी, कर्नाटकासह सीमाभागातील महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी तीन हजार रुपयांपर्यंत जाहीर करून ऊसतोड सुरू केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे. गत हंगामातील ५०० रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून ५ हजार ५०० रुपये द्यावा, अशी रयत संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी आहे. हा दर मिळवण्यासाठी विधानसभे वर गुरुवारी (ता. ७) मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.
यावेळी सागर पाटील, महादेव शेळके, विकास पाटील, संजय पोवार, सदाशिव पोवार, नवनाथ पोवार, विश्वनाथ पोवार, अजित नलवडे, अनिल सुतार, चेतन पाटील, एस. पी. पाटील, रामदास पाटील, संभाजी चौगुले, सतीश कांबळे, आनंदा नलवडे, दादासो शेळके, आपासो शेळके, सूर्यकांत पोवार, पांडुरंग उबाळे, रामचंद्र मगदूम, तानाजी तिरवत, दादासो चौगुले, गोविंद मगदूम, सचिन कांबळे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.