निपाणी (वार्ता) : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नॅशनल इंनोवेशन फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने ९ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हरियाणा येथील डीबीटी, टीएचएसटी आयई आरसीबी कॅम्पस फरिदाबाद येथे १७ ते २० जानेवारी पर्यंत झाला. यामध्ये माध्यमिक विभागात कर्नाटकातून कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले हे ‘एज्युकेशन फॉर ऍस्पिरिंग इंडिया- नॅशनल सायन्स टीचर्स वर्कशॉप’ या विभागात सहभागी झाले. विविध राज्यातील निवडक विज्ञान शिक्षकाना यासाठी निवडण्यात आले होते.
चौगुले यांनी सहज उपलब्ध साहित्यातून पाण्याचे विद्युत पृथ:क्करण, विद्युत विलेपन, प्रकाश संश्लेषण क्रिया, अशा विविध कमी खर्चिक प्रयोगाचे सादरीकरण करतांना शालेय स्तरांवर ‘नवीन प्रयोगशाळा तंत्रज्ञान’, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील विज्ञान शिक्षकाची भूमिका स्पष्ट केली. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात प्रयोग शाळेतील संशोधन आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान विकसित करण्यासाठी २३ देशांतील नामवंत शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ यांनी आपल्या विचारांची देवाणघेवाण केली. इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथन, डॉ. अरविंद रानडे, डॉ. आशुतोष शर्मा, गोपाळ अयंगर, मुकेश रॉय, मनीष जैन, व्ही. जी. गंभीर, डॉ. विठ्ठल रायगावकर यांनी मार्गदर्शन केले. महोत्सवामध्ये सायन्स चॅलेंज, स्पेस हॅकथॉन, गेम्स अँड टॉइज,फेस टू फेस सायन्स इन्ट्रॅकशन, सायन्स व्हिलेज यांचा समावेश करण्यात आला. डॉ. शर्मिला बिंती-मलेशिया, डॉ. निग्युना किमेंगी-केनिया, मार्क प्रेन्सकी-यूएसए, केनेथ मटेंग्यु-नामीबिया, सेइंग हल-कंबोडिया, डॉ. रोडोल्फ कॅलझाडो-फिलिफाइन्स, डॉ. ईदाह सिथोले नाईनग-झिम्बाब्वे, वर्धन गेवोरग्यान-आर्मेनिया, डॉ. मराइला अगोलटी अर्जेंटिना, डॉ. फ्युफ्यु विन- म्यानमार, डॉ. इझाक नजुगुण किमेंगी-केनिया आशा विविध देशातून आलेल्या संशोधकाशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे विज्ञानातील नाविन्यपूर्ण संकल्पना शालेय स्तरांवर वापरणे अनुकूल ठरणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले. विज्ञान किट व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.