गटनेते विलास गाडीवड्डर : विरोधी गटाच्या बैठकीत मंत्री महोदयावर डागली तोफ
निपाणी (वार्ता) : गेल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत आश्रय योजनेतील घरे, शहर आणि उपनगरातील रस्ते, गटारी, पथदीप यासह चोवीस तास पाणी देण्याची कामे आपण नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात केली आहेत. पण कामाचे कोणतेही श्रेय घेतले नाही. आता मात्र यापूर्वी आपल्या कारकीर्दीत मंजूर झालेली नगरपालिकेच्या कामांचे उद्घाटन मंत्री महोदय व लोकप्रतिनिधी करीत आहेत. हे त्यांना शोभन्यासारखे नसून रस्ते गटारी सोडा आणि शाश्वत विकास कामे करा, असा सल्ला नगरपालिकेतील विरोधी गटनेते विलास गाडीवड्डर यांनी दिला आहे. सोमवारी दुपारी आयोजित विरोधी गटाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई-सरकार, डॉ. जसराज गिरे, दत्ता नाईक, दीपक सावंत, अनिस मुल्ला, सुनिता गाडीवड्डर यांच्यासह विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते.
गटनेते गाडीवड्डर म्हणाले, तत्कालीन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन त्यात नगरोत्थानमधील तिसर्या भागाच्या कामाला मंजुरी मिळवली. त्यानंतर राज्य सरकारकडूनही त्याला मंजुरी मिळवून सर्वात प्रभागात कामे घेवून कामाची ऑर्डरही दिली. पण 2018 साली नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी नगरपालिका चा निकाल लागून त्यामध्ये त्यांचीच सत्ता आल्याने व राज्य आणि केंद्रात सरकार असल्याने त्यांच्याकडून शहराचा विकास व्हावा या अपेक्षेने आपण गेल्या पंधरा महिन्यापासून कोणत्याच प्रकारची वाच्यता केली नाही. शिवाय विकासकामांमध्ये आडकाठी आणली नाही. पण पंधरा महिने संधी देऊनही त्यांच्याकडून कोणतेच शाश्वत विकास कामे न होता केवळ रस्ता गटारीचे उद्घाटन होताना दिसत आहे.
वारंवार या कामातील कंत्राटदारांना बदलून वेगवेगळ्या कंत्राटदारांना काम दिल्याने हे काम बरेच वर्षे रखडले होते. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही मंजूर केलेली कामे मंत्री महोदय करत असून त्यांनी या कामास मंजुरी आणली असेल तर एकाच व्यासपीठावर येण्यासाठी कधीही तयार आहोत. विशेष म्हणजे लसीकरण व आधार कार्डाच्या कामाचे उद्घाटनही स्वत: करत सुटले आहेत. सदरची कामे ही नगरसेवकांचे असून त्यांना ही कामे करण्यापेक्षा उन्हाळ्यात नद्यांना 4 टीएमसी पाणी, शहराबाहेरून लिंक रोड, नवीन आश्रय योजना घरासाठी चे नागरिकांचे कर्ज माफ अशा अनेक गोष्टी केल्यास खर्या अर्थाने शहराचा विकास होणार आहे. आज तागायत त्यांनी शहरासाठी विशेष अनुदान आणलेले नाही. याउलट आपण राज्य सरकारकडून तीस कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे किंवा सर्वच प्रभागात समान कामे घातली आहेत. सत्ता राहू द्या पण विकास कामे करा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. 24 तास पाणी योजना अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू असताना नवीन पद्धतीने पाणीपट्टी आकारु नये, असे खुद्द खासदारांनी सांगितले होते. पण संबंधित अधिकारी मात्र त्याची आकारणी करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची गोची होत आहे. गेल्या पंधरा महिन्यात एकही नगरपालिकेचे बैठक वेळेवर न झाल्याने विकास कामाला खीळ बसत आहे. एकंदरीत मीपणा सोडून काम केल्यास सर्वांचेच भले होणार असल्याचे गाडीवड्डर यांनी स्पष्ट केले.
