आंदोलनाला ६ रोजी ४३ वर्षे पूर्ण;१२ शेतकऱ्यांचे बलिदान
निपाणी (वार्ता) : ऐतिहासिक तंबाखू आंदोलनात १२ शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या आठवणीसाठी आंदोलन नगरात त्यांचे छोटे खाणी स्मारक केले आहे. त्या ठिकाणी प्रशस्त असे स्मारक उभे करण्याच्या दृष्टीने दरवर्षी चर्चा केली जाते. त्यानंतर मात्र कोणतीच हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांचे हुतात्मा स्मारक उपेक्षितच राहिले आहे.
येथे तंबाखू दरासाठी १४ मार्च ते ६ एप्रिल १९८१ अखेर ऐतिहासीक आंदोलन झाले. ६ एप्रिल २०२४ रोजी त्याला ४३ वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १२ शेतकऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. अलीकडच्या काळात तंबाखूला चांगला दर मिळत असल्याने त्यांच्या बलिदानाचे सार्थक होत आहे.
तंबाखूला योग्य भाव मिळालाच पाहिजे, काडी माती मिळणार नाही, शेतकरी संघटनेचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणांनी ४३ वर्षापूर्वी निपाणीत ऐतिहासिक तंबाखू उत्पादकांचे आंदोलन झाले.
यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री आर. गुंडूराव सरकारने पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन करणाऱ्या सुमारे ५० हजार शेतकऱ्यांवर ६ एप्रिल रोजी बेछुट गोळीबार व लाठीमार केला. त्यात बारा शेतकऱ्यांचा बळी गेला. त्यात ज्ञानू सुबराव सूर्यवंशी – रामपूर आबासाहेब आप्पासाहेब इंगळे-चिखलव्हाळ, भाऊ लक्ष्मण कोडकर व गोविंद लक्ष्मण कोंडेकर-गळतगा, ज्योती देवू गावड-भोज, महादेव भीमा तावडे-अक्कोळ, अनंत रामा कुराडे-लिंगनूर शंकर रामा रेंदाळे-एकसबा, थळू भिवा कांबळे – जत्राट ज्ञानदेव मल्लू पाटील व कृष्णा दादू पाटील – नागनूर, दिनकर दाजी चव्हाण-ममदापूर यांचा समावेश आहे.
शेतकरी संघटनेची व्यापाऱ्याशी १३ मार्च रोजी वाटाघाट निष्फळ ठरल्याने १४ मार्च १९८१ पासून शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली तंबाखूला उत्पादन खर्चाशी निगडीत भाव मिळण्यासाठी व्यापक आंदोलन छेडले होते. त्यावेळी यमगर्णीपासून निपाणीतील कोल्हापूर वेशीपर्यंत हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे २४ दिवस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.पोलिसांनी अखेर आंदोलकांना वेढा घातला होता.
३१ मार्च रोजी कर्नाटक शासनाने आंदोलन चिरडण्याचा निर्णय घेतला. ४ एप्रिल रोजी शेतकरी संघटनेने निपाणी बंदचा आदेश देऊन सुमारे ५० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरून काढला. ६ एप्रिल रोजी पहाटे पोलिसांनी बेछुट गोळीबार व लाठीमार करून २४ दिवस चाललेले आंदोलन उठविले.
शरद जेशी, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, गोपीनाथ धारिया यांच्यासह संघटनेच्या नेते व कार्यकर्त्यांना अटक झाली. या गोळीबाराचे वृत्त बीबीसीसह आकाशवाणीवर तात्काळ देण्यासह सर्व वृत्तपत्रांनी ठळकपणे घटनेचे वृत्त दिले होते. ७ एप्रिल १९८१ रोजी लोकसभेत विरोधकांनी सभात्याग करून गोळीबार प्रकरणी चर्चेची मागणी केली होती. त्यादिवशी निपाणीतही लाठीमार झाला होता.
—————————————————————
शेतकरी संघटना नावापुरती
आंदोलनानंतर शेतकरी संघटनाही नावापुरतीच शिल्लक राहिली आहे. आतातर दरवर्षी ६ एप्रिल रोजी हुतात्मा स्मारकाजवळ जमून पुष्पहार घालण्याचा कार्यक्रम तेवढाच काही नेते मंडळी शेतकरी करीत आहेत.
—