आंदोलन नगरात शोककळा
निपाणी (वार्ता) : येथील आंदोलन नगरातील बारावी मधील वर्गमित्र काळम्मावाडी, (ता. राधानगरी) पर्यटन करून धरण पाहण्यासाठी गेले होते. पण पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (ता.१) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश चंद्रकांत कदम (वय १८) आणि प्रतीक पाटील (वय २२) दोघेही रा. आंदोलननगर निपाणी अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे आंदोलननगर परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दोघांच्याही मृतदेहांचा शोध सुरू होता.
गणेश कदम या युवकाला पोहता येत नव्हते. तरीही काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडू लागला. त्याची कल्पना आल्यानंतर मोटर चालक प्रतीक पाटील यांने कदमला वाचविण्यासाठी डोहात उडी मारली. पण पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तोही पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली आहे.
घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक खंडू गायकवाड, पोलीस भैरवनाथ पाटील, रघुनाथ पोवार दाखल झाले आहेत. जयसिंग किरुळकर, धोंडीराम राणे हे नदी पात्रात उतरून शोध कार्य चालविले आहे. राधानगरी परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतच आहे. त्यामुळे शोधकार्य पथकाला अडथळा निर्माण होत आहे. अद्याप दोघांने मृत देह सापडले नसून शोध कार्य चालू आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.