

जोल्ले, पाटील यांच्यामुळे वाढली चुरस ; राजकीय गोटात चर्चेला उधाण
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी सत्ताधारी गटाकडून माजी खासदार विद्यमान संचालक आण्णासाहेब जोल्ले आणि सहकाररत्न उत्तम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीनंतर पुन्हा पाटील आणि जोल्ले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते मंडळी उत्तम पाटील यांच्या सोबत असल्याने त्यांना लाभ होण्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
निपाणी तालुक्यातून ११७ प्राथमिक ग्रामीण कृषी पत्तीन सहकारी संघ आहेत. यातील सर्वाधिक ठराव कोणाकडे आहेत व मतदान कोणाच्या बाजूने अधिक होते त्याची त्याची गोळा बेरीज राजकीय गोटात सुरू आहे. बरेच कृषी संघ उत्तम पाटील यांच्याकडे आहेत. शिवाय संघाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. जोल्ले आणि पाटील हे सहकार क्षेत्रातील दिग्गज आहेत. दोघांनाही या क्षेत्रातील सर्व माहिती आहे. त्यामुळे या निवडणुक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
उत्तम पाटील यांनी गुरुवारी (ता.९) उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी अण्णासाहेब जोल्ले यांनी यापूर्वी अर्ज दाखल करून प्रचाराचा नारळ फोडला आहे. मतदानासाठी कमी दिवस राहिल्याने उत्तम पाटील हे प्रचाराचा नारळ कधी फोडणार याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तम पाटील यांच्या निवडणुकीची धुरा माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, पंकज पाटील, सुजय पाटील, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि आजी-माजी नगरसेवक सांभाळणार आहेत. तर अण्णासाहेब जिल्ले यांच्या प्रचाराची धुरा आमदार शशिकला जोल्ले, आमदार भालचंद्र जारकिहोळी, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे, हालशुगर अध्यक्ष एम. पी. पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंत बाटले यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांनी खांद्यावर घेतली आहे.
——————————————————————–
बोरगावमधून हालचालींना प्रारंभ
बोरगाव येथील अरिहंत संस्थांच्या वार्षिक सभेमध्ये व्यासपीठावरूनच जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा झाली. तिथूनच हालचाली सुरू झाल्या. त्या आता गतिमान झाल्या असून निपाणी मतदारसंघातून जिल्हा बँकेत कोण जाणार? हे प्रचारावरून समजणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta