युवकाला 80 हजाराचा गंडा: नागरिकांच्या सतर्कतेची गरज
निपाणी (वार्ता) : सर्वत्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाच्या वतीने फसवणुकीपासून नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन येत आहे. तरीही अनेकजण ठकसेनेच्या जाळ्यात अडकले जात असून त्यांना आर्थिक व मानसिक नुकसान सहन करावे लागत आहे.
येथील एका उद्योजक युवकाची अशीच बनावट कर्ज देणार्या कंपनीकडून फसवणूक होवून 80 हजारांचा गंडा बसला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
एका ’बजाज’चे बनावट नाव धारण केलेल्या कंपनीच्या जाळ्यात शहरातील एक युवक अडकला. त्याने आपल्या संदर्भातील माहितीची ऑनलाईन देवाण -घेवाण केली. त्या बनावट कंपनीकडून आपणाला आता थोड्याच अवधीत कर्जाची रक्कम पोहोच होईल, असे अमिष दाखवले. तत्पूर्वी आपल्या बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने प्रथम 1 रूपये पाठविण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार त्याने 1 रूपये पाठविताच कांही मिनिटांतच 39 हजार 500 इतकी रक्कम दोनवेळा त्याच्या ऑनलाईन खात्यातून काढून घेण्यात आली. त्यानंतर सदर युवकाने आपली रक्कम परत मिळविण्यासाठी धडपड केली. पण त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय बनावट कंपनीचा संपर्क तुटला. अखेर पोलिसांकडे धाव घेतली असता त्यांनी सायबर क्राईमकडे तक्रार करण्याचे आवाहन केले.
इंटरनेटवरून होणारे आर्थिक व्यवहार, मोबाईल अॅपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. जिथे पैसा, तिथे धोका हे तत्त्व सायबर गुन्ह्यांमध्येही दिसून येते. ई-शॉपिंग, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल अॅपमधून होणार्या खरेदी – विक्री व्यवहारांतून पैसे हडप केले जात आहेत. त्यामुळेच सायबर गुन्ह्यांमध्ये आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
डेबिट – क्रेडिट कार्ड, ईमेल याचा पिन वा पासवर्ड कोणालाही देऊ नये, असे वारंवार सांगण्यात येते. परंतु बँकेतून कॉल आल्याचे भासवणार्या भामट्यांवर अतिविश्वास ठेवणे ग्राहकांना भोवते. लोकांचा अॅपवर, बँकेच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याने त्याची खातरजमा करण्याची तसदी घेतली जात नाही.
गुन्हेगारांकडे काही वेगळे, अद्ययावत वा नवीन तंत्रज्ञान नसते. परंतु ते मानवी कल लक्षात घेऊन सापळा रचतात. त्यातून ईमेल, अॅप, लिंक, बोगस कॉल सेंटर वगैरे सापळे रचले जातात. त्या सापळ्यात अडकविण्याचे तंत्र मोडून काढण्यासाठी सर्वसामान्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
बँकेमधून फोन आल्याचे भासवणार्या भामट्याकडे आपल्या खात्याचा बर्यापैकी तपशील असतो. बँकांकडून पुरविल्या जाणार्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डाच्या सुरुवातीचे काही क्रमांक सारखेच असतात. हे भामटे तेच क्रमांक सांगतात आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो. वेगवेगळ्या ऑफरच्या नावाखाली मोबाइल क्रमांक घेतले जातात. यातून मोबाइलचा डेटा जमा होऊन त्याची विक्री होते. म्हणूनच वेगवेगळ्या कंपन्या, बँकांच्या एजन्सीकडून सारखे फोन येतात. ऑनलाईन त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना सजग राहणे आवश्यक आहे.
—
’केवळ ई-व्यवहार नाही तर, सोशल मिडीयावर वावरताना विशेष काळजी घ्यावी. त्यावर लाईव्ह लोकेशन, खासगी माहिती, फोटो शेअर करू नयेत. गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन नागरिकांना लक्ष्य करू शकतात. या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.’
– संगमेश शिवयोगी, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …