नववर्षानिमित्त निपाणी रोटरीच्या संकल्प : डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांची माहिती
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यासाठी शहरात केवळ रोटरी क्लबची एकमेव रक्तपेढी आहे. गांधी रुग्णालयासह खासगी रुग्णालयामध्ये दररोज सरासरी २० पेक्षा अधिक रक्त पिशव्यांची मागणी आहे. मात्र रक्तदान करण्यासाठी मात्र कुणी पुढे येत नाही किंवा शिबिरासाठीही पुढाकार घेत नाहीत. रक्तपेढीत आठवड्यात तीन दिवस रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने निपाणी रोटरी क्लबने विविध मंडळ व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने दर महिन्याला ३५० रक्तांच्या पिशव्या संकलित करण्याचा नववर्षानिमित्त संकल्प केला आहे.
अपघातग्रस्त, प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गरोदरमातांसह गंभीर रुग्ण गांधी हॉस्पिटलसह खासगी रुग्णालयांत दाखल होतात. ज्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे, त्यांना डॉक्टरांकडून रक्त पिशवी आणण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रक्तपेढीतून दरदिवशी जवळपास २० हून अधिक रक्त पिशव्यांची मागणी होते. त्या तुलनेत मात्र रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अपघात, शस्त्रक्रिया व इतर रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी कोल्हापूर, चिक्कोडीकडे धाव घ्यावी लागत आहे. परिणामी काहीवेळा रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. अशा परिस्थितीत रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांनाही रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येते. त्यामुळे निपाणी रोटरी क्लब ने नवीन वर्षात रक्त संकलन करण्याच्या संकल्प केला आहे. त्यायासाठी सामाजिक संस्था, नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
—————————————————————–
‘शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. अशावेळी रक्ताअभावी गंभीर रुग्ण दगावू शकतो. हा तुटवडा भरून काढण्यासाठी हा नवा संकल्प केला आहे. शिबिर घेण्यासह रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लबतर्फे बक्षीसही दिली जात आहेत.’
-डॉ. सी. बी. कुरबेट्टी,
संस्थापक, रोटरी क्लब निपाणी
——————————————————————–
‘विविध सामाजिक संस्थाकडून दरवर्षी रक्तदान शिबिरे राबविण्यात येत होती. अलीकडच्या काळात शिबिरे कमी झाली आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या महिन्यात रोटरी क्लब आणि वैद्यकीय मंडळींच्या सहकार्याने शिबिर घेतले होते. अशा प्रकारची शिबिरे घेतल्यास रोटरी क्लबने केलेला संकल्प तडीस जाणार आहे.’
-दिलीप पठाडे,
अधिकारी रोटरी रक्तपेढी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta