माणकापूर पॉवरलूमचे अध्यक्ष अर्जुन कुंभार : ढोणेवाडीतील विणकरांच्या बैठकीत ठराव
निपाणी(वार्ता) : विणकर समाज संघटनेच्या मागण्यांची दखल घेत राज्य सरकारने आपल्या बजेटमध्ये विणकरांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मोफत प्रवेश, व्याज दरात आठ टक्के सवलत, वार्षिक सहाय्यधन निधी ५००० रुपये केली आहे. आता किसान सन्मान योजनेप्रमाणे विणकर सन्मान योजना केंद्र व राज्य सरकारकडून सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे माणकापूर पावरलूम संघटनेचे अध्यक्ष अर्जुन कुंभार यांनी सांगितले. ते ढोणेवाडी येथे आयोजित बैठकीत बोलत होते. कुंभार म्हणाले, विणकर समाज विकासापासून वंचित आहे. कोरोना महामारीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती आणखीन खालावली आहे. त्यांना हातभार लावण्यासाठी म्हणून विणकर किसान सन्मान योजना मिळवण्यासाठी आपली संघटना कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ढोणेवाडी पॉवरलूम संघटनेचे अध्यक्ष आण्णासो नागराळे, भीमराव खोत, सोमनाथ परकाळे, जनार्दन सासणे यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस अनिल पाटील, शिवाजी खोत, सुनील कुंभार, शुभम साळुंखे, सोमनाथ परकाळे, यांच्यासह ढोणेवाडी, माणकापूर, चाँदशिरदवाड, कारदगा, नेज, मलिकवाड आदी भागातील विणकर समाजबांधव, यंत्रमाग मालक उपस्थित होते.
