निपाणी(वार्ता) : येथील पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बाजूला लक्ष्मीमार्बल दुकानच्या नजीक असलेल्या प्रकाश चंदुलाल शहा यांच्या मालकीच्या फार्म हाऊस परिसरात आग लागल्याची घटना गुरुवारी (ता.१०) दुपारी घडली. आजची घटना कळताच अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी आल्याने त्यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, गेल्या काही वर्षापासून प्रकाश चंदुलाल शहा यांचे फार्म हाऊस आहे. रस्त्यालगत असलेल्या फार्म हाऊसमुळे अज्ञात व्यक्तीकडून बिडी ओढून टाकल्याने आग लागल्याचे घटनास्थळावरून बोलले जात आहे. आग लागताच निपाणी येथील अग्निशामक दलाला संपर्क साधला असता तातडीने अग्निशामक बंब घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. सदर आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसून शिवाय कोणतेही किमती साहित्य जळालेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. आगीची घटना पाहण्यासाठी महामार्गावरील नागरिकांनी गर्दी केली होती.
