
भरत कांबळे यांची माहिती : रामदास आठवले यांची उपस्थिती
निपाणी (वार्ता): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.१७) सकाळी दहा वाजता जत्राट येथे सामाजिक संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती भरत कांबळे यांनी दिली. बुधवारी (ता.१३) सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
भरत कांबळे म्हणाले, सामाजिक संघर्ष परिषदेमध्ये समाजातील तळागाळामधील नागरिकांच्या समस्या मांडण्यात येणार आहेत. याशिवाय शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी चर्चासत्र आयोजित केले आहे. रामदास आठवले यांच्या आरपीआयच्या नेतृत्वाखाली वंचितांना एकत्र आणण्याचा प्रयत्न यावेळी होणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या जयंतीसह त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यात येणार आहेत. राजकारणविरहित ही सामाजिक संघर्ष परिषद प्रथमच जत्राट येथे घेण्यात येणार आहे. त्यामुळे निपाणीसह ग्रामीण भागातील नागरिकांनी या परिषदेस उपस्थित रहावे.
रविवारी सकाळी नऊ वाजता बुद्ध वंदना झाल्यानंतर प्रतिमापूजन होणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यावर सकाळी दहा वाजता रामदास आठवले यांचे आगमन होणार आहे. यावेळी बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील, आरपीआयचे प्रदेश संघटक सुनील सर्वगौड, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, महाराष्ट्र राज्य सचिव मंगलराव माळगे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लेश चौगुले, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश भिवसे, सदस्य रमेश कांबळे, हिटलर माळगे, बाबासाहेब कांबळे, योगेश कांबळे, राहुल कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बैठकीस जयवंत कांबळे, विकास शितोळे समीर कांबळे, राजू कांबळे, रमेश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.