प्रा. सोहन तिवडे यांचे मार्गदर्शन : कोरोनामधील शिक्षणाचा आढावा
निपाणी (वार्ता) : बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. सोहन तिवडे यांची शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे शाळांचे कामकाज ठप्प झाले होते. या दरम्यान झालेल्या सर्व परिक्षा ऑनलाईन झाल्या. विद्यार्थी घरूनच अभ्यासाचे धडे गिरवत होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल घडल्याचे निदर्शनास येत आहे. यावेळी शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा बदल शिक्षकांनी कसा हाताळावा, याचे सखोल मार्गदर्शन प्रा. तिवडे यांनी केले.
नवनवीन प्रयोग आत्मसात करताना विद्यार्थ्यांना कसे विश्वासात घ्यावे. कोणत्या क्लुप्त्या वापराव्यात हे अनेक उदाहरणे देऊन त्यांचे स्पष्टीकरण त्यानी दिले. कायझन या जापनीज पद्धतीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात अमुलाग्र बदल घडवता येतो. कायझन पद्धतीत विचारांचे विलगीकरण, श्रेणीनुसार मांडणी, स्वच्छता आणि चमक, दर्जेदार स्विकार, आणि सातत्य या पंचसुत्रीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो हे देखील त्यांनी सांगितले.
प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांनी प्रा. तिवडे यांचे स्वागत केले. तीन तास चाललेल्या या कार्यशाळेत गोमटेशच्या शिक्षकांनी सहभाग घेतला. प्राचार्या दीपाली जोशी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta