बंबलवाड येथे शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कटिबद्ध आहे. सरकार कुणाचेही असो शेतकरी बांधवांच्या समस्या कायम आहेत. शेतकऱ्यांचे नावे घेऊन सत्तेवर यायचे आणि शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणे राबवायची असे सरकारचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्यास सरकार असमर्थ ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती खुंटते चालली असून दिवसेंदिवस तो कर्जबाजारी होत चालला आहे. यापुढे शेतकऱ्यावर अन्याय होवू देणार नाही. प्रसंगी सरकारशी दोन हात करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू. तसेच चिकोडी विभागात रयत संघटनेच्या शाखेचे जाळे निर्माण करू, असे प्रतिपादन चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केले. बंबलवाड (ता. चिक्कोडी) येथील शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संघटनेच्या शाखेचे उद्घाटन झाले. यावेळी रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी म्हणाले, सरकारने शेतकरी विरोधी केलेले काळे कायदे विविध शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे मागे घेतले आहेत. यापुढील काळात शेतकऱ्यावरील अन्याय कमी होण्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्त्वाची आहे. त्यामुळे गटातटाच्या राजकारणापासून बाजूला राहून शेतकऱ्यांनी आपले हित जोपासण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास बेळगाव जिल्हा अध्यक्ष राघवेंद्र नाईक, युवा अध्यक्ष बाळासाहेब हादिकर, निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, बंबलवाड शाखा अध्यक्ष आनंद पाच्छापूरे, सुभाष कमते, कुमार वळकेरी अण्णाप्पा पाच्छापुरे, भरमाप्पा सदलगे, बसू पाच्छापूरे यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी व रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
