किल्ले पाहण्यासाठी गर्दी; राजगड, रायगड, पन्हाळागड,भुईकोट, सिंधुदुर्गच्या प्रतिकृती : अनेक मंडळांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : दिवाळीनिमित्त यावर्षी कुन्नूरमध्ये स्वराज्य ग्रुप, धुडकुस ग्रुप, छत्रपती स्पोर्ट्स, शिवछत्रपती मंडळ, व्हीटीएम ग्रुपसह विविध मंडळांनी राजगड, रायगड, उदगीर- भुईकोट, सिंधुदुर्गसह इतर किल्ल्यांच्या मोठ्या प्रतिकृती हुबेहूब बनविल्या आहेत. किल्ल्यांची प्रतिकृती पाहण्यासाठी गडप्रेमींची मोठी गर्दी होऊ लागली आहे. आणखी काही दिवस ते गडप्रेमींना पाहता येतील. दरवर्षी मोठ्या प्रमाणात गड किल्ले करणाऱ्या कुन्नुर गावची ओळख आता किल्ल्यांचे गाव म्हणून होत आहे. विविध मंडळांनी साकारलेल्या या प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
दिवाळी हा आनंदाचा सण आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सणाला खूप उत्साह असतो. या उत्सवादरम्यान अनेक प्रथा, परंपरा पाळल्या जातात. दिवाळीला किल्ले बनवण्याची ‘क्रेझ’ आहे. कुन्नूर येथे दरवर्षी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या जातात. यावर्षी मंडळांनी मोठे किल्ले बनवले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पहिली राजधानी असलेला राजगडची हुबेहूब प्रतिकृती महिनाभराच्या कष्टातून साकारली आहे. राजगड पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची आणि बालेकिल्ला या चार विभागाला आहे. प्रत्येक माचीच्या स्वतंत्र तट सरनोबताची रचना हुबेहूब केली आहे. यामध्ये राजगडावर राजदरबार, दिवाणी खास राजसदर, जिजाऊवाडा, महाराजांचा राहता वाडा, पद्मावती मंदिर, आठ राण्यांचे राणीवाडे, ब्रह्मश्री मंदिर, जननी मंदिर, पद्मावती तलाव, तीनखांबी पाण्याची टाकी, पाली दरवाजा, महादरवाजा, चोर दरवाजा सह इतर चोरवाटा साकारल्या आहेत.
याशिवाय रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. विटा, दगड, फोम, प्लास्टर व सळईचा वापरून कार्यकर्त्यांनी प्रतिकृती साकारली आहे. शिवकाळात रायगड कसा होता, याची हुबेहूब प्रतिकृती केली आहे. राजसदर, मनोरे, चितदरवाजा, नाद दरवाजा महादरवाजा बाजारपेठ, अष्टप्रधानांचे वाडे, जगदिश्वरांचे मंदिर, नगारखाना, गंगासागर, हत्ती तलाव, वाघदरवाजा, भवानीकडा, हिरकणीचा बुरुज साकारला आहे. तर राज्याभिषेक मिरवणुकीचा देखावा साकारला आहे.
राजगड, किल्ल्यांची प्रतिकृती सांगली साकारली आहे.
काही पन्हळगडाची प्रतिकृती, तसेच पावनखिंड देखावा केला आहे. पन्हाळगडावर सवाकोटी, तीन दरवाजा, वाघदरवाजा, संभाजी महाराजांचे मंदिर, ताराराणीचा राजवाडाआदी साकारला आहे. किल्ल्यास सिदी जौहरचा वेढा पडला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सिदी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गानि ते पन्हाळ्यावरुन विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रतिशिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रतिशिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. हा हुबेहूल देखावा दाखवला आहे.
याशिवाय गावातील काही मंडळाच्या कार्यकत्यांनी उदगीर भुईकोट किल्ला साकारला आहे. किल्ल्यावरील धान्य कोठार, महाल, दारूगोळा कोटा, उदगीरबाबांचा मठ, मावळ्यांची निवासस्थाने, घोड्यांचा तबेला, लोहदरवाजा, महादरवाजा, परवान्याची खिडकी, चांदणी बुरुज, टेहळणी बुरुज, हौद विहीर यासह विविध महालांची प्रतिकृती साकारली आहे.
——————————————————
गणेश मिरवणूक किल्ला प्रतिकृती कुन्नूरचा दबदबा
कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कुन्नुर गावांमध्ये मराठी भाषकांची संख्या मोठी आहे. बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी गणेशोत्सव आणि दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. गणेशोत्सवाचे मिरवणूक आणि दिवाळीत किल्ले बनवण्यासाठी कुन्नूर गावचा तालुक्यामध्ये दबदबा कायम आहे.