भेलगाड्याचा व्यवसायही बंद : भाड्याच्या घरात कुटुंबाचा उदरनिर्वाह
निपाणी (संजय सूर्यवंशी) : गतवर्षीपासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गामुळे सर्वच व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. शिवाय हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांची मोठी वाताहात झाली आहे. त्यामुळे अनाथ असलेल्या श्रीशैल स्वामी यांचा भेळचा गाडा ही बंद झाला. स्वतःच्या कुटुंबाचे जेवणाचे अडचण असताना तरीही भाड्याच्या घरात राहुन निपाणी शहर व उपनगरात असलेल्या भिक्षूकांना दररोज अन्नदानाचे काम महिन्यापासून निरंतरपणे करीत आहेत. त्यांच्या या दानात वृत्तीचे निपाणी परिसरातून कौतुक होत आहे. श्रीशैल वसय्या स्वामी यांचे मूळ गाव मंगसुळी हे आहे. लहानपणीच त्यांचे आई वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे मामांनीच त्यांना लहानाचे मोठे केले. त्यानंतर निपाणी येथील मुलीशी त्यांनी विवाह केला. त्यानंतर पाणी येथेच भाड्याने खोली घेऊन भेल गाड्याचा व्यवसाय टाकला. पण लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाला. तरीही न डगमगता प्रशासनाने घालून दिलेल्या वेळेत दुचाकीवरून भेल विक्री करीत आहेत. व्यवसायात मिळालेल्या रकमेतून अस काही रक्कम बाजूला काढून त्यातून अनाथांना जेवण देण्याचा अनोखा उपक्रम स्वामी यांनी राबविला आहे त्यांच्या या कार्यात पत्नी आणि सासू यांचे सहकार्य लाभत आहे. आतापर्यंत स्वामी यांनी ५०० पेक्षा जास्त जेवणाची पाकिटे वितरित केली आहेत. निपाणी येथील अशोक नगरात स्वामी यांचा धनश्री भेळ नावाने व्यवसाय आहे. त्यांच्या भेलची चवच वेगळे असल्याने लॉकडाऊनच्या काळातही घरोघरी त्यांना मागणी आहे. ते दररोज दुपारी १२ वाजता आपली दुचाकी घेऊन बाहेर अनाथ त्यांची जेवणासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. भेटणाऱ्या प्रत्येक निराधाराला ते जेवण घेऊनच ते स्वतः जेवत आहेत. जेवणाच्या पाकिटात चपाती, भाजी, भात, आमटी यांचा समावेश आहे. या कामात त्यांना त्यांची पत्नी ज्योती व सासू गीता हिरेमठ यांचे सहकार्य लाभत आहे. श्रीशैल स्वामी हे भूमिहीन असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. तरीही कोरोना संकट समयी त्यांनी दाखवलेल्या माणुसकीला सलाम!
‘आपण स्वतः अनाथ असल्याने परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. भेल व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह करीत आहे. त्यातूनच उरलेल्या रकमेतून निराधारांना जेवण देण्याचे कार्य सुरू केले आहे. अनाथांच्या चेहऱ्यावरील समाधानच आपणाला महत्त्वाचे आहे.’
– श्रीशैलेश स्वामी, महादेव गल्ली, निपाणी