कसे लढणार कोरोनाशी : रुग्णांचा प्राण कंठाशी
निपाणी : विषाणूजन्य आजारांवर गुणकारी ठरलेल्या ’रेमडेसिव्हीर’ या इंजेक्शनची सर्वत्र मोठी मागणी असल्याने निपाणी शहरात अनेक दिवसांपासून त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही खासगी रुग्णालयांनी हात वर करीत रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती चिठ्या सोपविल्या आहेत. औषध आणल्यावर इलाज, अशी भूमिका घेतल्याने कोरोनाग्रस्तांचे प्राण कंठाशी आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यापासून महत्वाच्या विविध औषधांचा तुटवडा भासत आहे. मात्र या काळात लागणारी सर्व औषधे विविध ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. चार आठवड्यांपासून कोरोना संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. निपाणी तालुक्यात दररोज किमान 10 चा आकडा पार होत आहे. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेणे पसंत करत आहेत. सद्यस्थितीत चार खासगी रुग्णालयांत कोरोना संसर्गावर उपचाराची परवानगी आहे. याठिकाणी ’रेमडेसिव्हीर’ या विषाणू प्रतिबंधक इंजेक्शनचा वापर अधिक वाढला आहे. या काळात या इंजेक्शनची मागणी झपाट्याने वाढली असल्याने पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे.
शासकीय व सेवाभावी संस्थांच्या रुग्णालयांत या इंजेक्शनचा सद्यस्थितीत जेमतेमच साठा आहे. मात्र, खासगी रुग्णालयांना टंचाई भासत आहे. अशा रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना औषधाची चिठ्ठी हाती देऊन इंजेक्शन आणल्यावरच उपचार होतील, असे सांगितले जात असल्यामुळे रुग्णांचे नातेवाइक इंजेक्शनसाठी दारोदार फिरत आहेत. काही रुग्णालयांनी गंभीर रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयांतून उसनवार इंजेक्शन घेऊन उपचार सुरु केले असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. दरम्यान काही रुग्णांच्या नातेवाईकांनी हे इंजेक्शन दुप्पट दराने खरेदी केल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका डॉक्टरने दिली. कोरोना संसर्गात न्यूमोनियासारखे आजार असलेल्या गंभीर रुग्णांना रेमडेसिव्हीरच्या सहा इंजेक्शन पाच दिवसांत दिले जातात. मात्र न मिळाल्यास 11 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण केला जात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन औषध पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
—-
’गरज असेल त्याच रुग्णाला इंजेक्शनचा उपचार करणे महत्त्वाचे आहे. सर्वत्र मागणी वाढल्याने काही दिवसांपासून रेमडेसिव्हीरचा तुटवडा काही खासगी रुग्णालयांना जाणवत आहे. शासकीय रुग्णालयात सध्या पुरेशा प्रमाणात ते उपलब्ध आहे. या औषधांच्या उपलब्धतेसाठी जिल्हा स्तरावर प्रयत्न केले जातील.’
– डॉ. व्ही. व्ही. शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिक्कोडी
