नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेसह कोरोनाचा मुकाबला करत आहेत. याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘नाटक’ असल्याचे संबोधित असून, हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. भारतातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम डिसेंबर महिन्यापूर्वीच पूर्ण होईल, असे प्रत्त्युतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिले. पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही. भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसर्या लाटेला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
राहुल गांधींच्या आरोपाला उत्तर देताना जावडेकर म्हणाले, राहुल गांधी यांना अपुर्या लसीची चिंता आहे. त्यांनी सर्वप्रथम काँग्रेस शासित राज्यांकडे लक्ष द्यावे. याच राज्यांमध्ये सुरु असणार्या लसीकरण कार्यक्रमात गोंधळ होत आहे. आजचा राहुल गांधी यांच्या आरोपानंतर टूलकिट प्रकरण हे काँग्रेसचीच निर्मिती असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या पद्धतीची भाषा, तर्क आणि नागरिकांमध्ये भीती पसरविणे हा काँग्रेसच्या रणनीतीचा भाग असल्याचा दावा त्यांनी केला.
यापूर्वी काँग्रेस पक्षाकडून भारतात तयार झालेल्या लसीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच ही तर मोदी लस आहे, अशी टीका करण्यात आली. मात्र डिसेंबर महिन्यापर्यत देशातील १०८ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तयार पूर्ण केली आहे. सर्वात वेगाने लसीकरण होणारा भारत हा जगातील दुसर्या क्रमाकांचा देश ठरला आहे. ऑगस्ट महिन्यानंतर यामध्ये आणखी वाढ होईल, असेही जावडेकर म्हणाले. आजपर्यत केंद्र सरकारने २० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. ते पूर्णपणे मोफत आहे. डिसेंबरपर्यंत २१६ कोटी डोस लागणार असून याचीही तयारी झाली असल्याचे जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेस शासित राजस्थानमध्ये जावे. येथे दररोज बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याच आठवड्यात रुग्णवाहिकेत महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. राजस्थानमध्ये दररोज सुमारे ४०० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. अशा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे सर्वप्रथम राहुल गांधी यांनी लक्ष द्यावे., यानंतर पंतप्रधानांवर टीका करावी, असा सल्लाही जावडेकरांनी यावेळी दिला.