बेळगाव : राज्यातील नेतृत्व बदल होणार नाही, येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री राहणार असून 18 तारखेनंतर जनतेला नवे येडियुराप्पा दिसतील, असे वक्तव्य गोकाकचे आमदार व माजी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.
गोकाक येथे खासदार मंगला अंगडी यांच्या कन्या श्रद्धा शेट्टर यांनी आज गुरुवारी आशा कार्यकर्त्यांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण केले. या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी यांनी उपरोक्त वक्तव्य केले. राज्यातील नेतृत्वबदल होणार नाही. येडियुराप्पा हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. त्यानंतर 2023 मध्ये पुन्हा एकदा त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुक होईल व भाजप सत्तेवर येईल, असा विश्वास देखील रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो आहे. जे कोण नाराज आमदार आहेत, त्यांच्यासोबत बैठक घेऊन सामंजस्याने प्रश्न मिटवण्यात येतील. पुढील दोन वर्षे येडियुराप्पाच मुख्यमंत्री राहतील आणि भविष्यात भाजपच सत्तेवर येईल, असे त्यांनी सांगितले.
मंत्री के. एस. ईश्वराप्पा हे एक चांगले व्यक्ती आहेत. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास प्रसारमाध्यमांनी केल्यामुळे भाजपा दोन गट झाले असे वाटत असले तरी प्रत्यक्षात दोन गट नाहीत असे सांगून ईश्वराप्पा हे माझ्यासारखे खुल्या दिलाचे रोखठोक व्यक्ती आहेत ते असले फूट पाडण्याचे काम कधीही करणार नाहीत. योगेश्वर हे माझेही मित्र आहेत. या सरकारच्या रचनेत 20 आमदारांसह योगेश्वर यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे योगेश्वर यांना भेटून मी सर्व गोष्टी निकालात काढणार आहे, असे माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी शेवटी स्पष्ट केले.
Check Also
न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा द्या : बेळगाव बार असोसिएशनची मागणी
Spread the love बेळगाव : तामिळनाडूमध्ये, न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला …