बेळगाव : कोल्हापूर येथील नामांकित अशा वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकताच विविध पुरस्कारांचे वितरण झाले. या पुरस्कारांचे वितरण युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाले. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र व कर्नाटक सिमाभागातून दर्जेदार अशी शेकडो पुस्तके प्राप्त झाली होती. या पुस्तकातील रुपये 7000/- किंमतीची पुस्तके मणगुत्ती (ता. हुक्केरी, बेळगाव) येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालय या हायस्कूलला वाचनकट्टा पेट्रन व अमरावती विभागाचे डेप्युटी कमिशनर संजय पवार यांच्या हस्ते हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. के. स्वामी आणि कार्यालयीन सुपरीडेंट संजय कोतेकर यांच्याकडे युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्या उपस्थित सपुर्द करण्यात आले.
कर्नाटक सीमा भागात दक्षिण महाराष्ट्र मंडळ ही मराठी भाषिक संस्था असून या संस्थेची लालबहादूर शास्त्री विद्यालय ही मराठी शाळा मणगुती या गावी सुरू आहे. या शाळेतून आज अनेक क्षेत्रात अनेक विद्यार्थी आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्वल करीत आहेत. वाचनकट्टा संस्थेचे अध्यक्ष युवराज सतबा कदम यांचे शालेय शिक्षण सुद्धा या हायस्कूलमध्येच पूर्ण झाले आहे. ही बांधिलकी समजून वाचनकट्टा संस्थेच्यावतीने लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचा सन्मान करण्यात आला. यावेळी वाचनकट्ट्याचे अध्यक्ष युवराज कदम, मुख्य समन्वयक प्राचार्य रेखा निर्मळे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे सहाय्यक संचालक डॉ. विजयकुमार जगताप, राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, उद्योजक युवराज पाटील, विद्या प्रसारक मंडळ गडहिंग्लजचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, हरी काका अध्यात्मिक केंद्र हत्तरगीचे विश्वस्त प्रा. डॉ. सुनील देसाई, डॉ.सरोज बिडकर, वाचनकट्टा उपाध्यक्ष संतोष वडेर, सचिव वनिता कदम, तृप्ती कागिणकर, दशरथ दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.