
शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांचा महत्वपूर्ण आदेश
बेंगळुरू : पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली असून २२ एप्रिल ते १८ मे या कालावधीत होणाऱ्या या परीक्षेसाठीदेखील हिजाबवर बंदी कायम ठेवण्यात आली असून प्रत्येक विद्यार्थ्याने गणवेश परिधान करून परीक्षेला हजर राहणे अनिवार्य आहे, असा महत्वपूर्ण आदेश कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी दिला आहे.
२२ एप्रिल ते १८ मे यादरम्यान २०२१-२२ या सालातील पीयूसी द्वितीय वर्षाची परीक्षा होणार आहे. यासंदर्भात बेंगळुरू विधानसौध येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, या परिषदेत शिक्षणमंत्र्यांनी हि माहिती दिली आहे. हि परीक्षा एसएसएलसी धर्तीवरच घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी गणवेश परिधान करणे सक्तीचे आहे, हिजाबसह कोणत्याही धार्मिक पोशाखाला परीक्षा केंद्रात परवानगी देण्यात येणार नाही. गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीप्रमाणे पुरवणी परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. सराव परीक्षेप्रमाणेच अंतिम परीक्षा घेण्यात येणार असून दहावी परीक्षेप्रमाणेच पीयूसी परीक्षा घेण्यात येणार असल्याचेही बी. सी. नागेश यांनी सांगितले. सकाळी १०.१५ ते दुपारी १.३० या वेळेत परीक्षा पार पडणार आहेत. एकूण ६८४२५५ विद्यार्थी परीक्षा देणार असून यामध्ये ३४६९३६ विद्यार्थी, ३३७३१९ विद्यार्थिनींचा समावेश आहे. एकूण १०७६ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार असून कला शाखेचे २२८१६७, वाणिज्य शाखेचे २४५५१९, आणि विज्ञान शाखेचे २१०५३९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एकूण ५२४१ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून प्रवेशपत्रिका दाखविल्यानंतर मोफत बससेवा मिळणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.
पाठ्यपुस्तकातील टिपू सुलतान यांचा इतिहास वगळण्यात आला असून यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शिक्षणमंत्री म्हणाले, आधारविरहित अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आला आहे. मात्र टिपू सुलतान यांच्यावरील संपूर्ण अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आला नसल्याचे बी. सी. नागेश म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta