बेळगाव (प्रतिनिधी) : दिगंबर जैन मठ – श्रवणबेळगोळ चे परम पूज्य स्वस्तिश्री चारुकीर्ती भट्टारक स्वामीजी यांचे गुरुवार दि. २३ मार्च रोजी सम्यक समाधीपुर्वक देवलोकगमन झाले.
३ मे १९४९ रोजी वारंगा येथे जन्मलेल्या स्वमैजीनी वयाच्या विसाव्या वर्षी दीक्षा घेतली व एकविसाव्या वर्षी भट्टारक पीठावर विराजमान झाले. लहानपणापासून त्यांचा कल जैन तत्वज्ञानाकडे होता. त्यांनी प्राकृत, संस्कृत व कन्नड भाषेतून जैन तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. तत्वज्ञान व इतिहासात त्यांनी म्हैसूर व बेंगळूर विद्यापीठातून एम. ए. केले होते. याबरोबरच इंग्रजी व हिंदीवरही त्यांचे प्रभुत्व होते. श्रवणबेळगोळच्या भट्टारक पिठाचा इतिहास प्राचीन आहे. इ. स. ९८१ साली गंगा राजदरबारातील मंत्री चावुण्डरायने भगवान गोम्मटेश्वराची भव्य अखंड मूर्ती उभारून श्रवणबेळगोळला इतिहासात स्थान दिले. इ. स. ९८१ साली त्याच्या पहिल्या मस्तकाभिषेकासाठी त्याने भट्टारक पिठाचे पुनरुज्जीवन केले. त्यानंतर हे पद व भट्टारक हे सातत्याने जैन समाजाला मार्गदर्शन करत राहिले आहेत.
चारुकीर्ती भट्टारक स्वामींनी भट्टारक म्हणून आपल्या ५३ वर्षांच्या कार्यकाळात ४ वेळा महामस्तकाभिषेकाचे नेतृत्व केले. अनेक शाळा, अभियांत्रिकी कॉलेज, पॉलिटेक्निक, २ सुसज्ज इस्पितळे तसेच प्राकृत भाषेच्या संवर्धनासाठी विद्यापीठ स्थापन केले. भक्तनिवास, भोजनशाळा निर्माण केल्या. १९८१ साली भगवान महावीर यांच्या निर्वाणाच्या २५०० व्या जयंती निमित्त तसेच पहिल्या मस्तकाभिषेकाच्या १००० व्या जयंती निमित्त देशभर धर्मचक्र यात्रेचे आयोजन केले. ततत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ‘कर्मयोगी’ ही उपाधी बहाल केली व त्या या महामस्तकाभिषेकासाठी उपस्थित राहिल्या. श्रवणबेळगोळ येथे अनेक विकासकामे त्यांच्यामुळे शक्य झाली. त्यांचे सगळ्यात मोठे योगदान म्हणजे जैन धर्मातील धवल, महाधवल व जयधवल या महा ग्रंथांच्या ४० खंडांचे त्यांनी मूळ प्राकृत भाषेतून कन्नड भाषेत अनुवाद करून घेतला. या प्रकल्पासाठी १०० हुन अधिक तज्ज्ञ १० वर्षे झटत होते. स्वामीजी उत्तम वक्ते होते. युरोपसह अमेरिका, केनिया, इंग्लंड, अशा अनेक देशात त्यांना निमंत्रित केले गेले व तिथे त्यांनी जैन धर्मविषयक प्रवचने दिली.
बेळगावचा त्यांचा संबंध खूप जुना आहे. पण २०१८ सालच्या महामस्तकाभिषेकाच्या निमित्ताने खासकरून भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या विनोद दोड्डण्णावर यांची त्यांनी राष्ट्रीय सचिवपदी नेमणूक केल्यावर तो जास्त दृढ झाला. २०१९ साली दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात आलेल्या प्रलयंकारी पुराच्या वेळी त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या चातुर्मासाचे व्रत मोडले व या काळात प्रवास केला. तब्ब्ल एक आठवडा त्यांनी बेळगाव, अथणी, उगार, सांगली, हुक्केरी या भागातील शेकडो गावांना भेटी दिल्या, तिथल्या पूरग्रस्तांना धीर दिला, हजारो जीवनोपयोगी साहित्याच्या किट्स चे वाटप केले. २०१९ साली आचार्य शांतीसागर महाराज यांच्या दीक्षा महोत्सवाच्या निमित्ताने हुक्केरी तालुक्यातील यर्नाळ इथे भव्य शांती स्मारक उभारावे व तिथे वर्षभर कार्यक्रम व्हावेत ही त्यांची कल्पना तडीस गेली. त्यांच्या जाण्याने जैन समाजच नव्हे तर अवघा देश एका प्रगल्भ, विद्वान गुरूला मुकला आहे.