एकूण संख्या 182 वर, अजूनही वाढ होण्याचे संकेत
बंगळूर : धारवाड येथील एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोना बाधित विद्यार्थ्यांची संख्या आता 182 वर गेली असून गुरुवारी हा आकडा केवळ 66 इतका होता. अजूनही या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेले विद्यार्थी आणि कर्मचार्यांनी कोरोना लसींची दोन्ही डोस घेतले आहेत. या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काही दिवसांपूर्वीच फेशर्स पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. त्यानंतरच कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 400 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 300 विद्यार्थ्यांच्या चाचण्या झाल्या असून त्यापैकी 182 विद्यार्थींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका आठवड्यापूर्वी कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता फेटाळता येत नाही. धारवाडचे उपायुक्त नितेश पाटील यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार 66 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली असून आज उर्वरित 100 जणांची चाचणी केली जाणार आहे. महाविद्यालयातील कर्मचार्यांच्याही कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या संसर्ग झालेल्यांना विलगीकरणामध्ये ठेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
आरोग्य अधिक्षक डी. रणदीप यांनी कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या चाचण्यांनंतर जीनोम सिक्वेन्सिंगसाठीही हे नमुने पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. कोरोना संसर्गाचा हा विस्फोट एखाद्या नवीन करोना व्हेरिएंटमुळे झालेला नाही ना? हे तपासून पाहण्यात येणार आहे. सध्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. धारवाडचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. यशवंत यांनी, संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणं दिसून येत नसल्याचं स्पष्ट केले.
राज्याच्या आरोग्य विभागाने कॉलेजशी संबंधित रुग्णालयामधील सुमारे तीन हजार कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …