बंगळुरू : २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी एकजूट करण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांसाठी १७-१८ जुलै ही तारीख खूप महत्त्वाची आहे. या दोन्ही दिवशी पुन्हा एकदा विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यापूर्वी विरोधकांची पाटण्यात एक सभा झाली होती, त्यानंतर आज आणि उद्या विरोधक बंगळुरूमध्ये एकत्र येणार आहेत. या बैठकीचा अजेंडा आणि मिनिट टू मिनिटाचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला असून, त्यामुळे या बैठकीत तरी विरोधी एकजुटीच्या दिशेनं विरोधक ठोस निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात पाटणा येथे नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक धोरण ठरवण्याच्या दृष्टीनं अनिर्णितच होती. बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही. आता या पार्श्वभूमीवर १७-१८ जुलै रोजी होणारी बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
दोन दिवसीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष
या बैठकीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, कारण पहिल्या आणि दुसर्या सभेच्या या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. आजवर विरोधी एकजुटीचे सर्वात मोठे नेते म्हणून पाहिले जाणारे शरद पवार यांच्याच पक्षात बंड झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे प्रबळ नेते अजित पवार यांनी थोरल्या पवारांची साथ सोडत भाजपची कास धरली. अजित पवार सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत, तर त्यांच्या अर्थ खात्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. अशातच आज विरोधकांच्या बैठकीचा भाग असलेल्या बंगळुरूतील डिनरला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच, टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या डिनरपासून आधीच स्वतःला दूर केलं आहे. मात्र, १८ जुलै रोजी होणार्या चर्चेत ममता बॅनर्जी सहभागी होणार आहेत.
१७ जुलै रोजी विरोधकांचं डिनर
आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टींनुसार, विरोधकांची बैठक ६-८ वाजण्याच्या सुमारास आयोजिक करण्यात येणार आहे. ही एक औपचारिक बैठक असणार आहे आणि यानंतर ८ वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांद्वारे सर्व विरोधी पक्षांसाठी रात्री स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. १८ जुलैला सर्व बैठका सकाळी ११ वाजता सुरू होतील आणि संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. कॉंग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाळ उपस्थित राहणार आहेत.
विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी अजेंडा
१. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यासाठी उप-समितीची स्थापना आणि युतीसाठी आवश्यक संवादाचे मुद्दे
२. पक्षाच्या परिषदा, रॅली आणि दोन पक्षांमधील विरोधाभास दूर करण्यासाठी उपसमिती तयार करणं
३. राज्याच्या आधारावर जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करणं
४. EVMच्या मुद्द्यावर चर्चा करणं आणि निवडणूक आयोगासाठी सुधारणा सुचवणं
५. युतीसाठी नाव सुचवणं
६. प्रस्तावित युतीसाठी महासचिवालय स्थापन करणं