बेळगाव : बेळगावातील कोरोना विषाणूचा गणेशोत्सवात सामना करण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. जास्तीत जास्त मूर्तिकारानी लसीकरण करावं यासाठी प्रयत्न केले जात आहे.
लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ यांच्यातर्फे शनिवारी सकाळी 10 वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक येथील समादेवी मंगल कार्यालयात गणेश मूर्तिकार व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबिय सदस्यांसाठी कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लसीकरण कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी आमदार अनिल बेनके आले होते. बेनके यांच्या हस्ते गणेश मूर्तीची व लोकमान्य टिळक प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उत्तर मतदारसंघात लसींना प्रचंड मागणी असून ठिकठिकाणी लसीकरणाला गर्दी पाहायला मिळत आहे. लसींचा मोठ्या प्रमाणात तुडवडा आहे. अशा परिस्थितीत लोकमान्य गणेश महामंडळ यांनी राबवलेला मोफत कार्यक्रम कौतुकास्पद असून आपल्या नागरिकांना कोरोनाच्या लढाईत गणरायाकडून बळ मिळावे यादृष्टीने महामंडळ पदाधिकाऱ्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असं अनिल बेनके म्हणाले.
लसीकरण शिबीर कार्यक्रमाच्या शेवटी महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव म्हणाले, मूर्तिकार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबिय सदस्यांना कोविड-19 या महामारीपासून वाचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय सदस्य यांच्याबरोबरच जनसामान्य नागरिक महामंडळाचे सदस्य मिळून 200 पेक्षा जास्त जणांनी या लसीकरण सुविधेचा लाभ घेतला.
सुरुवातीपासून स्वत: लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे पदाधिकारी या कार्यक्रम स्थळी हजर होते. सुरुवातीला 200 मूर्तीकारांचं लसीकरण या कार्यक्रमातून होणार होतं.
या कार्यक्रमाला आसपासच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लसीकरणासाठी आलेली संख्या पाहता आणखी एकदा 200 जणांचं लसीकरण करण्याचं ठरवण्यात आलं. लसीकरणासाठी कार्यक्रमस्थळी सकाळी 9 वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्या होत्या.
या कार्यक्रमातील गर्दीचं नियोजन लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासन करत होते.
यावेळी उपस्थित महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, हेमंत हावळ, सुनील जाधव, अर्जुन रजपूत, नितीन जाधव, गिरीश धोंगडी, योगेश कलघटगी, रवी कलघटगी, यासह अन्य गणेश महामंडळाचे स्वयंसेवक उपस्थित होते.