
हुक्केरी : शट्टीहळ्ळी तालुका हुक्केरी येथे बुधवार दिनांक 24 रोजी दुपारी भरदिवसा बंद घराचे दरवाजे तोडून चोरी करण्यात आली. मंगळवारी सालाबाद प्रमाणे देवीचा गोंधळ उत्सव रात्रभर पार पडला. त्यानंतर गावकऱ्यांसाठी आयोजन करण्यात आलेल्या महाप्रसादासाठी नागोजी तुकाराम कळविकट्टे हे आणि त्यांचे कुटुंबीय घर बंद करून भावेश्वरी मंदिराकडे गेले होते. ही संधी साधत चोरट्यानी त्याच्या घराचा मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व घरातील तिजोरीतील सव्वा दोन तोळे सोने व पाच हजार रुपये रोख रक्कम असा अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज लांबविला. हा प्रकार दुपारी बाराच्या सुमारास घडला असून नागोजी यांचे कुटुंबीय मंदिराकडून घरी आल्यानंतर घरात तिजोरीतील साहित्य विस्कळीत पडल्याचे आणि घरातील सोने तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच गावचे पंच दयानंद शिंदे यांनी यमकनमर्डी पोलिस स्थानकाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली. सदर घटनेची नोंद यमकनमर्डी पोलीस स्थानकात झाली असून भर दिवसा झालेल्या घरफोडीमुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या भागात आपली गस्त वाढवावी अशी मागणी शट्टीहळ्ळी ग्रामस्थांनी केली आहे
Belgaum Varta Belgaum Varta