बेळगाव : बेळगावातील बिम्स इस्पितळाला उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नुकतीच भेट देऊन तेथील गैरकारभाराबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा बिम्सला लवकरच भेट देणार असल्याचे नियोजन आहे. मात्र या पार्श्वभूमीवर बिम्स संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प अचानक दीर्घ रजेवर गेल्याने उलट–सुलट चर्चेला ऊत आला आहे.
कोविड रुग्णांसह अन्य रुग्णांनाही बिम्समध्ये व्यवस्थित उपचार केले जात नसल्याची वारंवार तक्रार आल्याने उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नुकतीच बिम्सला भेट देऊन तेथील गैरकारभाराबाबत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या शेजारीच बेड्सवर कोरोना रुग्णांचे मृतदेह ठेवल्याची बाब त्यांनी गांभीर्याने घेऊन संबंधित अधिकाऱ्यांचे कां उपटले होते. बीम्स प्रशासनात समन्वय नाही, येथील अधिकारी आपल्याच विश्वात दंग आहेत, त्यांना त्यांच्या विश्वातून बाहेर काढतो अशी तंबी सवदी यांनी दिली होती. त्यानंतर बीम्स जिल्हा सर्जन डॉ. हुसेनसाब खाजी यांनी ७ परिचारिकांना कर्तव्यात कसूर केल्यावरून सेवामुक्त केले आहे.
सेवामुक्त परिचारिकांनी यात आपला नव्हे तर डॉक्टरांचा दोष असल्याचे सांगून निदर्शने करून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. याच दरम्यान, मुख्यमंत्री ४ जूनला बेळगाव दौऱ्यावर येत असून या भेटीत ते बिम्सला भेट देण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बिम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी मात्र दीर्घ रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी १ महिन्याची दीर्घ रजा मागणारे पत्र वैद्यकीय शिक्षण खात्याच्या मुख्य सचिवांना लिहिले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या गैरहजेरीत बिम्सच्या शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. उमेश कुलकर्णी बिम्स संचालकपदाचा कार्यभार पाहतील असे आपल्या पत्रात नमूद केले आहे.