दांडेली : उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली ग्रामीण पोलिसांनी मोठी मोहीम राबवून नकली नोटा चलनात आणणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ६ जणांना अटक करून लाखो रुपये मूल्याच्या नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे.
दांडेलीतील डीडीएल वनश्री भागातील शिवाजी कांबळे नामक एकाच्या घरातून या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. ४.५ लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात ९ लाख रुपये दर्शनी मूल्य असलेल्या नोटा तो एकाला देणार असल्याचे कळल्यावर दांडेली ग्रामीण पोलिसांनी छापा मारून हि कारवाई केली. यावेळी खोट्या नोटा चलनात आणणाऱ्या ६ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ४.५ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि ७२ लाख रुपये दर्शनी मूल्य असलेल्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या.
अटक केलेले दोघे जण महाराष्ट्रातील आहेत. किरण देसाई (४०), गिरीश पुजारी (४२), बेळगावचे अमर नायक (३०), सागर कोन्नूरकर (२९), दांडेलीचे शब्बीर कुट्टी (४५) आणि शिवाजी कांबळे (५२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या धंद्यासाठी वापरलेल्या २ कारही जप्त करण्यात आल्या आहेत. दांडेली ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.