मिरज (सांगली): शहरातील शासकीय कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला आज सायंकाळी अचानक गळती लागली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ही गळती वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. घटनास्थळी अग्निशमन दलासह तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्यासह रुग्णालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला छोटीशी गळती लागल्याचा प्रकार प्लांटच्या देखभालीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आला. त्याने तातडीने ही गळती आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने रोखली. याची माहिती रुग्णालयाच्या परिसरातील रुग्णांच्या नातेवाईकांना समजताच यापैकी काही नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात धावपळ केली. यापैकी काहींनी माध्यम प्रतिनिधींशी संपर्क साधला आणि ऑक्सीजन प्लांटच्या शेजारी गर्दीही केली. या गर्दीमुळे अफवाही मोठ्या प्रमाणात पसरली आणि घटनेचे गांभीर्य अधिक वाढले. तोपर्यंत घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशमन दलानेही धाव घेतली.
अत्यंत छोट्या प्रमाणात झालेली ही गळती काही मिनिटातच देखभालीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी रोखली. हा प्रकार गंभीर नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु अफवांमुळे या घटनेचे गांभीर्य वाढले. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तहसिलदार डी. एस. कुंभार यांचेसह अग्निशमन दल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी थांबून होते. येथील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला ठेवण्यात आला होता. याबाबत योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिल्या.