विद्यार्थ्यांचे नुकसान तर ग्रामस्थांची कागदपत्राविना होतीये पायपीट
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यापासून कित्येक गावे नेटवर्कअभावी वंचित आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामस्थांना व युवावर्गाला नेटवर्कअभावी कोणतीही खाजगी स्वरूपाची कामे होत नाहीत, अत्यावश्यक व एखादी आपत्ती ओढवूल्यास बाहेर गावी व तालुक्याच्या ठिकाणी संपर्क होत नाही, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, क्लास घेता येत नाही, शासकीय कार्यालय व ग्रामपंचायतीमधे ऑनलाइन सेवा नसल्याने कागदपत्रांअभावी ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी पायपीट करावी लागते.
एकंदरीत, नेटवर्कअभावी भागातील आडुरे, कोकरे, किरमटेवाडी, न्हावेली, माळी, पेडणेकरवाडी, उमगाव, सावतवाडी, खळणेेकरवाडी, धुरीवाडी, जांबरे, नागवे, श्रीपादवाडी या कित्येक गावांना अश्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ आता त्रासलेला असून आजतागायत जिल्हाप्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे लवकरात लवकर यांवर मार्ग काढून या भागामध्ये नेटवर्क टॉवरची उभारणी करावी अशी आर्त हाक युवावर्गातून होत आहे.
एकीकडे भारत देश प्रगतशील देशाकडे वाटचाल करतं असताना त्याच देशातील कित्येक गावे हीं मात्र अश्या अनेक सुविधेपासून वंचित राहून आपल्या मागण्यांसाठी आजहीं झगडत आहे. ग्रामस्थ, युवावर्ग, शेतकरी, विद्यार्थी हे उद्याचे भवितव्य असल्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार व दूरसंचार विभागाने अश्या समस्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी येथील जनतेकडून होत आहे.