अचानक होत्याच नव्हतं झाल्याने भविष्यासाठी हवाय आधार
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : ‘होत्याच नव्हतं होणं’ म्हणजे काय..? आणि अचानक डोक्यावरच छत्र हरवून पोरकं होणं कसं असत हे तडशीनहाळ येथील दोन लहान भावंड अनुभवत आहेत. लहानपणीच आई सोडून गेली. तर आजोबांचा कोरोनामुळे बळी गेला. हे संकट कमी की काय म्हणून वडिलांचे निधन झाले. असे चारी बाजूने संकट ओढवल्याने बिचारे यश युवराज कांबळे व त्याचा लहान भाऊ श्रेयस पोरके आणि अनाथ झालेत. यश अवघा १५ वर्षाचा तर श्रेयस ९ वर्षाचा आहे. आता घरी आधार देणार कोणीच राहील नाही.
या कोरोनाने अनेक कुटुंब अशीच उध्वस्त केली आहेत. चंदगड तालुक्यातील हीच करुण कहाणी ऐकून अनेकांनी या पोरक्या भावंडांना मदतीचा हात दिला आहे. असेच तालुक्यातील सामाजिक कार्यात सहभागी असलेले अडल्या नडलेल्याला मदत करणारे गुडेवाडीचे गजानन शिवाजी कोकितकर यांनी केली आहे. आपल्यापरिने त्या चिमुकल्यांना गृहोपयोगी साहित्य, कपडे, समान दिले आहे. तसेच भविष्यात होईल ती मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या या मदतीने या पोरक्या मुलांना आधार मिळाला आहे. समाजातील अशाच मदतीच्या आणि दानशूर हातांची या कुटुंबाला गरज आहे. कोकितकर यांनी सामाजिक भान राखत या मुलांना जमेल ती मदत केली आहे. त्यांच्या या मदतीबद्दल या मुलांनी त्यांचे आभार मानले आहेत.
कांबळे कुटुंब हे तडशीनहाळ येथे पत्र्याच्या शेडमध्ये राहत असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. युवराज यांची बायको निघून गेल्यानंतर वडील आणि दोन मुलांचा ते सांभाळ करीत होते. मात्र, कोरोनाने वडिलांचे निधन झाले आणि लगेचच युवराज यांचे ही अकस्मात निधन झाले. त्यामुळे ही दोन मुले पोरकी झाली आहेत. त्यांच्या नातेवाईकांचीही परिस्थिती हालाकीची असल्याने कोणीही या दोन्ही मुलांची जबाबदारी घेण्यास तयार नाही. त्यामुळे या मुलांच्या भविष्याची तरतूद होण्यासाठी कोकितकर यांच्यासारख्या मदतीच्या हातांची गरज आहे.