बेळगाव (वार्ता) : शहरातील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आयोजित ‘आजादी का अमृतमहोत्सव’ या विषयावरील चर्चासत्र शुक्रवारी उत्तम प्रतिसादात पार पडले.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली यानिमित्त या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डाॅ. विनोद गायकवाड हे होते. आपले समयोचित विचार व्यक्त करताना प्रा. गायकवाड यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक पिढ्यांनी बलिदान दिले आहे. हे ध्यानात घेऊन देश आपल्यासाठी काय करतो? याचा विचार करण्यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे स्वातंत्र्याचा आनंद कर्तव्य भावनेतून बंधनातून घेतला पाहिजे. दुसऱ्याच्या सुखात आनंद मानणारी प्रवृत्ती माणुसकीतील संस्कृती दर्शविते असे सांगून सर्वांनी राष्ट्रीय संपत्तीचे नैतिकतेने संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे स्पष्ट केले.
प्रा. डॉ. मनीषा नेसरकर आणि डाॅ. मैज्जोद्दिन मुत्तावली यांनीही यावेळी समयोचित विचार व्यक्त केले. चर्चासत्रात गिरीश जोशी, राजू जुवरे, सुधाकर जोगळेकर, किशोर पाटील, संतोष मादकाचे, सोनाली कांगले, प्रियांका भांदुर्गे, पूजा डेळेकर, अशोक अलगोंडी, कल्पना रायजाधव आदींचा सहभाग होता. प्रा. डाॅ. चंद्रकांत वाघमारे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या चर्चासत्राचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. संजय कांबळे यांनी केले. प्रियांका भांदुर्गे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.