बंगळूरू : कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काही काँग्रेस आमदार आणि नेत्यांनी विधानसौधपर्यंत बैलगाडीतून प्रवास केला.
कुमारकृपा सरकरी निवासातून सिध्दरामय्या, सदाशिवनगर येथील घरापासून डी. के. शिवकुमार बैलगाडीत बसून विधानसौधला जायला निघाले असता हजारो नेते आणि कार्यकर्ते या अनोख्या मोर्चात सहभागी झाले. विरोधी पक्ष नेते सिध्दरामय्या यांनी स्वत: बैलगाडी चालविली. त्यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते एस. आर. पाटील, आमदार एम. बी. पाटील, प्रकाश राठोड आदीनी साथ दिली. बैलगाडीमागून जाणारे पक्षाचे कार्यकर्ते भाववाढ व भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत होते.
काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या बैलगाडीत कार्याध्यक्ष रामलिंगा रेड्डी, ईश्वर खंड्रे यांच्यासह कांही आमदार सवार झाले होते. बैलगाडी मोर्चा सुरू करण्यापूर्वी बोलताना शिवकुमार म्हणाले, भाजप सरकार देशातील जनतेच्या खिशाला कात्री लावित आहे. पेट्रोल, डिझेलचे दर 25 रुपयाने कमी करून 75 रुपयापर्यंत खाली आणले पाहिजेत. सामान्य जनतेला अडचणीत आणणारे एलपीजी सिलिंडरचे दरही कमी करण्याची गरज आहे. इंधन दर वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. या सरकारला कान, डोळे नाहीत. या जनविरोधी सरकारला खाली खेचीपर्यंत आमचा लढा चालूच राहणार असल्याचा त्यांनी इशारा दिला.
पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते सिध्दरामय्या म्हणाले, भाजप खोटे बोलत आहे, ते फक्त आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींना दोष देत आहेत. आम्ही अधिवेशनदरम्यान हे सभागृहात अधोरेखित करणार आहोत. एलपीजी गॅसचे दर 150 रुपये आणि पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 25 आणि 15 रुपये प्रति लिटरने कमी करण्याची मागणी काँग्रेसने केली.
शहराच्या विविध भागातून काँग्रेसचे आमदार बैलगाडीतून विधानसौधपर्यंत आल्याने शहराच्या कांही भागात वाहतूकीची समस्या निर्माण झाली. कांही ठिकाणी पोलिसांनी बैलगाड्यांना रोखल्याने पोलिस व काँग्रेस नेत्यांमध्ये वादाच्या घटना घडल्या. त्यानंतर पोलिसांनी केवळ आमदारांनाच बैलगाडीतून जाण्यास परवानगी दिली. शिवकुमार, सिध्दरामय्या, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामलिंग रेड्डी, एम. बी. पाटील, ईश्वर खंड्रे आदी बैलगाड्यांवर स्वार झाले होते. हे नेते बैलगाडीत असताना काँग्रेसचे आमदार वेंकटरमप्पा आणि बी. के. संगमेश खाली पडले. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
——————————————–
केंद्रात यूपीएची सत्ता असताना काँग्रेसने हा मुद्दा अजिबात मांडला नाही. यूपीएच्या काळात पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लीटर पार केली होती, पण त्या वेळी ते शांत होते. आम्हाला माहित आहे की ते हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. आमच्याकडे त्याचे उत्तर आहे. -मुख्यमंत्री, बसवराज बोम्माई