तळागाळापर्यंत विकासाची गंगा पोहोचवा : मुख्यमंत्र्यांचे आवाहन
बेळगाव : आज राज्याच्या राजधानीत बेळगाव महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी भगवे फेटे परिधान करून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बैठक गृह भगवेमय बनले होते. जणू हिंदुत्वाची गंगा राज्याच्या राजधानीत पोहोचल्याची अनुभूती या कार्यक्रमाने आली.
महापालिका निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व असे यश मिळाल्याने पुढील रणनिती आखणे आणि इतर मार्गदर्शनासाठी भाजपचे 35 नवनिर्वाचित नगरसेवक डोईला भगवा फेटा बांधून आज सोमवारी बेंगळूरात दाखल झाले. त्याठिकाणी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची नूतन नगरसेवकांनी भेट घेतली. बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने न भूतो असे यश संपादन केल्याने नवनिर्वाचित नगरसेवकांनी ओळख करून घेण्यासाठी आणि आगामी विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बेंगळूरचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची बेंगळूरला जावून 35 भाजपा नगरसेवकांनी भेट घेतली.
या विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आमदार अभय पाटील यांचे विशेष कौतुक केले. तसेच अभय पाटील आणि आमदार अनिल बेनके यांच्याशी चर्चा केली.
बेळगाव महापालिकेत भाजपला अनपेक्षित यश मिळाले असून नगरसेवकांनी मतदारांचा विश्वास कायम राखताना तळागाळापर्यंत विकासाची गंगा पोहोचवावी तसेच भविष्यातही महापालिकेत वरचष्मा कायम ठेवावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
