नगरसेवक रवी साळुंखे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्यात येत नाहीत. त्यासाठी वारंवार आंदोलने करावी लागतात. पोलिसांकडून मराठी भाषिकांवर दडपशाही केली जात आहे. त्यामुळे कर्नाटक आणि केंद्र सरकारला सांगून कन्नडसक्ती दूर करण्यात यावी, अशी मागणी नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
गोवा येथे निवडणूक प्रचारासाठी आलेल्या फडणवीस यांची साळुंखे यांनी भेट घेतली. त्यावेळी नगरसेवक साळुंखे म्हणाले, भाषिक अल्पसंख्यांक आयोगानुसार सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी भाषेतून सर्व कागदपत्रे सरकारी परिपत्रके देणे बंधनकारक आहे. तरीही कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक मराठी भाषिकांवर कन्नडसक्ती लादत आहे.
आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणार्या मराठी भाषिकांवर विविध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकरणी आपण कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून सीमा भागातील मराठी जनतेला न्याय द्यावा. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे त्यामुळे तेथील निर्णय सर्वांना बंधनकारक असणार आहे.
पण सीमा भागातील मराठी भाषिकांची हक्क जोपासणे सरकारचे कर्तव्य असून याबाबत आपण त्यांना सूचना कराव्यात अशी मागणीही नगरसेवक साळुंखे यांनी केली. फडणवीस यांनी साळुंखे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समीत कदम, अनंत टपाले व इतर उपस्थित होते.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …