सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक : सीमाभागातील नागरिकांना दिलासा
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाली आहे. कर्नाटकी शासनाच्या जाचक अटीमुळे महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणार्या प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणार्या प्रवाशांचे आरटीपीसीआर रिपोर्ट पाहूनच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. ज्या प्रवाशांच्याकडे रिपोर्ट नाही अशा प्रवाशांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात येत आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी आर. व्यंकटेश कुमार यांच्या आदेशानुसार तपासणी नाक्यावर आरटीपीसीआर रिपोर्ट किंवा कोरोना डोस घेतलेल्यांना सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. पण प्रत्यक्षात सीमा तपासणी नाक्यावर आरटीपीसीआर रिपोर्ट पाहूनच सोडण्यात येत असल्याने प्रवाशी वर्गांची तारांबळ उडाली आहे.
कर्नाटक सीमाभागात असणार्या महाराष्ट्रातील वंदूर, करनूर, शंकरवाडी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, उत्तूर यासह अन्य ठिकाणी जाणार्या महाराष्ट्रातील प्रवाशांचे ओळखपत्र बघून सोडण्यात येत आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रात असणार्या कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, शिरोली औद्योगिक वसाहत यासह कोल्हापूर व इतर ठिकाणी रोज ये-जा करणार्या कर्मचार्यांना या ठिकाणी सोडण्यात येत असल्याने सीमाभागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
निपाणी मंडल पोलीस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलीस स्टेशनचे एएसआय एस. ए. टोलगी, एस. एम. सूर्यवंशी, एस. के. नरेगल, राजू गोरखनावर यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. या ठिकाणी महसूल विभागाचे तात्यासाहेब पाटील, आरोग्य विभाग कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
Check Also
मराठा बँक पंचवार्षिक निवडणूक : चौघांची माघार; सत्ताधारी पॅनलला विजयी करण्याचे आवाहन
Spread the love बेळगाव : उद्या 22 डिसेंबर 2024 रोजी मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक …