Friday , April 18 2025
Breaking News

चोर्ला रस्ता तातडीने दुरुस्त करावा

Spread the love

बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे निवेदन

बेळगाव (वार्ता) : गोव्याकडे जाणारा चोर्ला रस्ता अत्यंत खराब झाला असून वाताहत झालेल्या या रस्त्यामुळे बेळगावच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होण्याबरोबरच वाहनचालकांना प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेंव्हा चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जावे, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली आहे.

बेळगाव ट्रेडर्स फोरमच्या शिष्टमंडळाने सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) मुख्य अभियंता संजीव हुलिकाई यांना आज मंगळवारी सकाळी सादर केले. जांबोटीपासून कर्नाटक-गोवा सीमेवरील चोर्ला गावापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून या रस्त्याची तातडीने होणे गरजेचे आहे. गोवा आणि गोव्याची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे बेळगावातून पुरवठा होणाऱ्या किराणामाल, दूध, भाजीपाला, कोंबड्या, अंडी, फुले आदी गोष्टींवर अवलंबून आहे. गेल्या अनेक दशकांपासून बेळगाव हे गोव्यासाठी व्यापारी केंद्र आणि पुरवठा केंद्र आहे.

बेळगावपासून सुमारे 150 कि.मी. अंतरावर असणारे गोवा हे सर्वात मोठे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असले तरी दैनंदिन गरजांसाठी ते शेजारील राज्यांवर अवलंबून आहे. बेळगावसह हुबळी, धारवाड, बेळ्ळारी, विजापूर, निपाणी, कोल्हापूर, कारवार आदी जिल्ह्यातून गोव्याला दररोज जीवनावश्यक साहित्याची वाहतूक होत असते. या खेरीज गोव्यातील उद्योग आणि अर्थव्यवस्था कच्च्या मालाच्या आयातीवर अवलंबून आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत असल्यामुळे अनमोड मार्गे गोवा वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक चोर्ला मार्गे वळत असल्यामुळे या रस्त्याची पार वाताहत झाली आहे. परिणामी गेल्या बऱ्याच महिन्यांपासून मोठे खड्डे आणि खाचखळग्यांनी भरून गेलेल्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास आणि वाहने नादुरुस्त होत असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन चोर्ला रस्त्याची तातडीने दुरुस्ती केली जावी, अशा आशयाचे निवेदन बेळगाव ट्रेडर्स फोरमने सादर केले.

सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व केंद्रीय रस्ते आणि खाजगी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही धाडण्यात आल्या आहेत. निवेदन सादर करतेवेळी सतीश तेंडुलकर यांच्यासह शेवंतीलाल शहा, विकास कलघटगी, किरण गावडे, अरुण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळांनाही पुरस्कार जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *